भाजपाचे उमेदवार विश्वेश्वर कागेरी-हेगडे यांच्या खानापूर येथील प्रचार सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन
खानापूर : देशाच्या भविष्याचा विचार करून मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करावे, देश निश्चित मोदींच्या नेतृत्वाखाली येत्या काही दिवसात महासत्ता बनेल, यात शंका नाही. खोटी आश्वासने देवून गॅरंटीच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस सरकारला पूर्णपणे बाजूला सारा आणि भाजपला विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खानापूर येथे कारवार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विश्वेश्वर कागेरी-हेगडे यांच्या प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात मोदीनी देशाला एका वेगळ्या विकासाच्या टप्प्यावर आणलेले आहे. जगात भारताचा नावलौकिक वाढवण्यासाठी मोदीनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहे. देशातील सर्व सामान्यांच्या हिताचाच विचार मोदी यांनी केलेला आहे. यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे, मजुरांचे हात बळकट करण्यासाठी मोदीनी वेगेवेगळ्या योजना राबवल्या आहेत. तसेच देव, देश धर्मासाठी त्यांनी महत्त्व देवून राम मंदिर पूर्ण केले आहे. त्यामुळे देशवासियांचे पाचशे वर्षाचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे. आज शेजारील देशही भारताच्या दडपणाखाली आहे. मोदी शासन आल्यापासून पाकिस्तानने कोणताही आततायीपणा करण्याचे धाडस दाखवलेले नाही. सैन्याला पूर्णपणे मोकळीक देवून भारताच्या सीमेचे रक्षण करण्यास मोदी समर्थ ठरले आहे. विकासाचे दुसरे नाव म्हणजेच मोदी आहे. दहा वर्षात भ्रष्टाचाराचा डाग नसलेले मोदी एकमेव जगातील पंतप्रधान आहेत. दहा वर्षात एकही घोटाळा देशात झालेला नाही. याचे श्रेय फक्त मोदी यांचे नेतृत्व आहे. इंडिया आघाडीही घोटाळेबाजांची संघटना असून त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा करणे म्हणजेच विनाशाकडे जाणे आहे. यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा विचारही केला जावू नये,
कर्नाटकात या निवडणुकानंतर काहीही घडू शकते. एकनाथ पॅटर्नही राबवला जाऊ शकतो. आणि तो पॅर्टन राबवण्यासाठी माझी काहीही मदत लागल्यास मी निश्चित मदतीला तयार आहे. असाही टोला त्यांनी लगावलेला आहे. बाळासाहेबांच्या विचारामुळेच आम्ही वेगळी वाट निवडली. आणि देशात इतिहास घडविलेला आहे. मोदी यांनी बाळासाहेबांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण केले आहे. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला कायम टोकाचा विरोध केला होता. त्याच काँग्रेसला आज डोक्यावर घेऊन नाचायची वेळ आली आहे. म्हणून आम्ही धनुष्यबाण वाचवलेला आहे. मोदीवर संविधान बदलण्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप बिनबुडाचा असून काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा कधीच सन्मान केलेला नाही. उलट संविधान दिन देशभरात साजरा करण्यासाठी आदेश देणारे मोदीच आहेत. तसेच इंग्लडमधील त्यांचा घराचाही स्मारक बनवण्याचा निर्णयही मोदीनीच घेतलेला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून खोट्या अफवा पसरुन लोकांची दिशाभूत करण्याचे काम करण्यात येत आहे. यावर विश्वास न ठेवता भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी देशाच्या संरक्षणासाठी आणि हितासाठी मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करावे, असे त्यांनी आवाहन केले. व्यासपीठावर आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, संजय पाटील बेळगाव, माजी आमदार सुनिल हेगडे हल्याळ, नासीर बागवान, प्रमोद मध्वराज, तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, पंडित ओगले यासह इतरांची भाषणे झाली.









