समीक्षा बैठकीनंतर भाजपने केला दावा
राजस्थानात मतदान पार पडले असून आता केवळ निकालाची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने समीक्षा बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर बोलताना भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी राजस्थानात जनतेने काँग्रेस सरकारच्या कुशासनाच्या विरोधात मतदान केल्याचा दावा करत राज्यात भाजप प्रचंड बहुमतासह सत्तेवर येणार असल्याचे म्हटले आहे. अरुण सिंह हे राजस्थानसाठी भाजपचे प्रभारी आहेत. त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडून फीडबॅक घेण्यासाठी समीक्षा बैठकीचे आयोजन केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी आणि राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते राजेंद्र राठौड या बैठकीला उपस्थित होते. यादरम्यान अरुण सिंह यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. अनेक राज्यांमधील भाजपचे निवडणूक प्रचार व्यवस्थापन मी पाहिले आहे. मी निश्चितपणे राजस्थान निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार मजबूत होता असे म्हणू शकतो. पूर्ण टीमने सकारात्मक गती राखत सातत्याने काम केले असल्याचे अरुण सिंह यांनी म्हटले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी दिवसरात्र काम केले असल्याचे वक्तव्य सी.पी. जोशी यांनी केले आहे.









