धारवाड मार्गावरही रेल्वेप्रवाशांसाठी थेट बससेवा
बेळगाव : रेल्वेप्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव-हुबळी आणि बेळगाव-धारवाड मार्गावर नवीन व्होल्वो बससेवा सुरू करण्यात आली आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून हुबळी रेल्वेस्थानकापयर्तिं ही बस धावत आहे. धारवाड-बेंगळूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून धारवाड रेल्वेस्थानकापयर्तिं एक राजहंस बस धावणार आहे. धारवाड रेल्वेस्थानकावरून दुपारी 12.25 वाजता सुटणारी बस बेळगाव बसस्थानकात 1 वाजून 55 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी सुटणारी बस दुपारी 12.30 वाजता धारवाड रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे. हुबळी रेल्वेस्थानकावरून सकाळी 11.30 वाजता सुटणारी बस 1.30 वाजता बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचणार आहे. तर बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 11 वाजता सुटणारी व्होल्वो बस दुपारी 1.10 मिनिटांनी हुबळी रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने बेंगळूरला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. धारवाड-बेंगळूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट सुरू झाली आहे. या आरामदायी प्रवासासाठी परिवहननेही व्होल्वो आणि राजहंस बससेवा सुरू केली आहे. बेळगाव परिसरातील नागरिकांना या बसच्या माध्यमातून धारवाड आणि हुबळी रेल्वेस्थानकांवर पोहोचता येणार आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी थेट व्होल्वो बससेवा
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक ते हुबळी रेल्वेस्थानक अशी थेट व्होल्वो बससेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती बसस्थानकातून धारवाड रेल्वेस्थानकापयर्तिं बससेवा धावत आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.
– के. के. लमाणी (डीटीओ, परिवहन)









