20 किलोमीटर उंचीपर्यंत धूराचे लोट
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियातील सर्वात सक्रीय ज्वालामुखीचा मंगळवारी 16 वर्षांनी विस्फोट झाला आहे. शिवेल्चू नावाच्या या ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे निर्माण झालेला धूराचा लोट 20 किलोमीटर उंचीपर्यंत पसरला आहे. या धूरामुळे रशियातील कामाच्का बेटावरील हवाईवाहतूक बंद करावी लागली आहे.

ज्वालामुखी विस्फोटानंतर बाहेर पडणारी राख पश्चिमेत 400 किलोमीटर तर दक्षिणेत 270 किलोमीटर अंतरापर्यंत फैलावली आहे. तर ज्वालामुखीतून बाहेर पडणारा धूर 1 लाख 8 हजार चौरस किलोमीटरमध्ये फैलावला आहे. या ज्वालामुखी विस्फोटाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ज्वालामुखीच्या उद्रेकापासून लोकांना वाचविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने परिसरातील सर्व शाळा बंद केल्या आहेत. लोकांनाही घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या ज्वालामुखीमध्ये मागील 10 हजार वर्षांमध्ये केवळ 60 वेळाच विस्फोट झाल्याची माहिती रशियन अकॅडमी ऑफ सायन्सने दिली आहे.









