मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे युवकांना आवाहन : पर्वरीत विवेकानंद भवनचे उद्घाटन
पणजी : “आजच्या युवकांनी आयुष्यात ठाम ध्येय निश्चित करणे आणि ते साध्य करण्यासाठी अथक परिश्रम घेणे गरजेचे आहे. युवकांनी राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे आले पाहिजे; तेव्हाच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा खरा वारसा आपल्या अंगी येईल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पर्वरी येथे ‘विवेकानंद केंद्र’साठी स्वतंत्र वास्तू मिळाल्याच्या ऐतिहासिक क्षणी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. ‘विवेकानंद केंद्र’च्या गोवा शाखेच्या वास्तूचे ‘विवेकानंद भवन’ आणि सभागृहाचे ‘मा. एकनाथजी सभागृह’ असे नूतनीकरण व नामकरण सोहळा गुऊवारी विद्यानगर-पर्वरी येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास पर्यटनमंत्री व पर्वरी मतदारसंघाचे आमदार रोहन खंवटे, पेन्ह द फ्रान्स पंचायतीचे सरपंच सपनील चोडणकर, केंद्राचे महाराष्ट्र-गोवा प्रांतप्रमुख अभय बापट व जिल्हा पंच सदस्य कविता नाईक उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे, विवेकानंद केंद्र खटखटी (आसाम) येथील महिलांनी हातांनी विणलेल्या अत्यंत नाजूक अशा शाल घालून मान्यवरांचा बहुमान करण्यात आला. सुमारे 7500 धाग्यांपासून तयार होणाऱ्या या शालांची विण दोन वेगवेगळ्या सूत संचांच्या कुशल जाळीदार गुंफणीतून केली जाते आणि एक शाल तयार करण्यास तब्बल दोन दिवसांचा काळ लागत असल्याने त्यांचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले. विवेकानंद केंद्राची स्थापना 7 जानेवारी 1972 रोजी कन्याकुमारी येथे झाली. केंद्राच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती शुभावती भोबे यांनी अलीकडेच एक वास्तू केंद्राला समर्पित केली. तिचे नूतनीकरण पूर्ण झाले व नामकरण सोहळा विश्वबंधुत्व दिनाचे औचित्य साधून गुऊवारी पार पडला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या अल्पायुष्यातच देशभर आदिवासी, ग्रामीण, शैक्षणिक, सांस्कृतिक, योग, ध्यान अशा विविध क्षेत्रांत कार्याचा जागर उभारला. ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हे त्यांचे तत्व आजही प्रेरणादायी आहे. या तत्वावर गेली 53 वर्षे विवेकानंद केंद्र ‘मनुष्यनिर्माण व राष्ट्रपुनऊत्थान’ या ध्येयाने कार्यरत आहे. गोव्यातही संस्कारवर्ग, योगवर्ग, युवा शिबिरे अशा उपक्रमांद्वारे युवक घडविण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, या कार्याला सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय बापट तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा जांबोटकर यांनी केले. शांती पाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
समाजप्रबोधनासाठी शुभावती भोबे यांची उल्लेखनीय देणगी : मुख्यमंत्री
या वास्तूच्या प्राप्तीसाठी दीर्घ काळ प्रयत्न सुरू होते. केंद्राच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती शुभावती भोबे यांनी ही संपूर्ण वास्तू केंद्रासाठी समर्पित करून मोठी देणगी दिली आहे. पर्वरीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एवढी विशाल जागा देणे ही छोटी गोष्ट नाही. येणाऱ्या पिढ्यांमध्ये विवेकानंदांचे राष्ट्रभक्तीचे विचार ऊजविणे, युवकांचे सर्वांगीण घडविणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणे या उद्देशाने ही वास्तू दिली असून, या इमारतीतून स्वामींचे विचार अखंड घुमत राहतील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले.
विवेकानंदांचे कार्य आजही प्रेरणादायी : खंवटे
“स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि त्यांचा प्रसार हे कार्य विवेकानंद केंद्र निस्वार्थी भावनेने करत आहे. आजच्या काळात असे समर्पित कार्यकर्ते मिळणे दुर्लभ आहे. माणूस आणि राष्ट्रनिर्मिती यासाठी केंद्राचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शिक्षण, महिला सशक्तीकरण, योग, युवा, आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रांत स्वामी विवेकानंदांचे कार्य अफाट आहे. ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ या तत्वावर प्रेरित होऊन मा. एकनाथ रानडे आणि स्वामी विवेकानंद यांच्या नावाने या वास्तूला सन्मान देण्यात आला असून, त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल,” असे पर्यटन मंत्री व पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी सांगितले.
विवेकानंदांचे स्वप्न पूर्ण करूया” : अभय बापट
“स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर रोजी शिकागो येथील धर्मपरिषदेत दिलेल्या प्रेरणादायी भाषणातून संपूर्ण जगाला ‘विश्वबंधुत्व’ाचा संदेश दिला आणि सनातन धर्माची गौरवशाली स्थापना केली. विवेकानंद हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत आणि गोव्यातही त्यांच्या विचारांवर आधारित कार्य उत्साहाने सुरू आहे. गोवा आणि स्वामी विवेकानंद यांचे नाते हे प्राचीन आणि दृढ आहे. गोव्यात त्यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत असून, त्यांच्या कार्याला आता या वास्तूमुळे स्थायी रूप मिळणार आहे. विवेकानंद हे युवकांचे मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत, तर एकनाथ रानडे यांनी ‘एक जीवन, एक ध्येय’ या तत्त्वाने प्रेरित होऊन कन्याकुमारी येथे भव्य विवेकानंद शिलास्मारक उभारले. या नामकरण सोहळ्याद्वारे या दोन्ही महापुऊषांना अभिवादन अर्पण करताना, ‘भारत माता उच्च शिखरावर जावी’ हे स्वामींचे स्वप्न आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण करावे,” असे अभय बापट यांनी नमूद केले.









