विविध भागांतून आलेल्या दिंड्यांचा सुंदर मिलाफ मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांकडून अभिषेक हजारो भाविकांनी घेतले देव श्रीपांडुरंगाचे दर्शन
सांखळी, डिचोली / प्रतिनिधी
विठ्ठलपूर-सांखळी येथे काल गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या भक्ती व श्रध्देने आलेल्या हजारो भक्तांच्या भक्तीरसाने विठ्ठलपूर अगदी ओलेचिंब झाले होते. भक्तांच्या महापुराबरोबरच संध्याकाळी कोसळलेल्या पावसाच्या दमदार धारांमुळे विठ्ठलपुरात भक्ती व निसर्ग यांचा सुंदर मिलाप पहायला मिळाला. धो धो कोसळण्राऱ्या पावसातही संध्याकाळपर्यंत विविध भागांतून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या येणे सुरूच होते. सारा परिसर विठुमय झाला होता.
शालेय मुलांच्या दिंड्यांचा आविष्कार
यावर्षीच्या आषाढी एकादशीला विशेष सुट्टी मिळाल्याने विठ्ठलपूर सांखळीतील या प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मंदिरात सकाळपासून भक्तांचा मेळा पहायला मिळाला. लहानमोठ्या दिंड्या मंदिराच्या परिसरात दाखल होऊ लागल्या होत्या. त्यात आज सुट्टी असतानाही प्राथमिक शाळा तसेच हायस्कुलच्या मुलांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून काढलेल्या दिंड्यांनी परिसर दणाणून सोडला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सकाळी श्री विठ्ठल मंदिरात जाऊन देवाला अभिषेक केला. धार्मिकविधीसह पूजा केली. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते.
राज्यात भक्तीमय वातावरण : मुख्यमंत्री
देवभक्ती आणि ईश्वरशक्ति प्राप्त करून आपण सामाजिक जीवनात कित्येक कामे करू शकतो. त्यासाठी संघटितपणा महत्त्वाचा असतो. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही मंदिर परिसरात भक्तीचा मळा फुललेला पाहून मन भरून येते. पावसाची पर्वा न करता हरिनामाच्या गजरात नाचत गात विठ्ठल मंदिरात येणारे भक्त खरेच अभिनंदनास पात्र ठरतात. आपल्या मुलांना भक्तीचा मार्ग दाखवणारा हा आषाढी एकादशी उत्सव असल्याचे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.
ग्रामीण भागांतून आल्या दिंड्या
सुर्ल, वेळगे, होंडा, वळपई, पर्यें, सांखळी, डिचोली, इत्यादी परिसरातील महिला पथकांनी चालत येत दिंडी सादर केली. पाळी, सुर्ला, कुडणे, न्हावेली, आमोणे, हरवळे, आणि सांखळी शहर परिसरातील विठ्ठलभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून देव पांडुरंगाचे दर्शन घेतले. वेळगे-सुर्ला या गावातून दोन दिंडी पथके हरिनामाचा गजर आणि टाळ, मृदंगांच्या तलावर चालत सांखळीला विठुराच्या भेटीला आली होती. पर्यावरण रक्षण आणि देवभक्ती यामुळे निसर्ग देवता प्रसन्न राहते, असे मत काही वारकऱ्यांनी व्यक्त केले.
प्राथमिक शाळांच्या दिंड्या
विठ्ठलपूर कारापूर भागातील विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारीत उत्स्फूर्त सहभाग दाखविला. सोबत पालकांनीही वारीत सहभागी होत विठ्ठल नामाचा गजर व जयघोष केला. मुख्याध्यापिका कल्पना मळीक व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष वर्धमान शेंदुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारी विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली. मंदिराच्या परिसरात विशेष नृत्य सादर करून परिसर दणाणून सोडला.
हेडगेवार शाळेने मिळविली वाहवा
कारापूर तिस्क येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार प्राथमिक शाळा व हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी कारापूर तिस्क ते विठ्ठलपूर अशी सवेष वारी काढत भक्ती सादर केली. हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी मंदिराच्या बाजूला मोठे रिंगण सादर करून लोकांकडून वाहवा मिळवली.
सारा परिसर झाला विठुमय
विविध हायस्कुल्स, शाळांमून वाऱ्यांचे विठ्ठलापुरात मार्गक्रमण सुरूच होते. डिचोली, सांखळी, सत्तरी या भागातून मोठ्या संख्येने वाऱ्या विठ्ठलापुरात दाखल झाल्या. डिचोली येथून सात आठ वाऱ्या सांखळीत दाखल झाल्या. सांखळी मतदारसंघतीलही विविध भागांतून वारकऱ्यांच्या दिंड्या आल्याने सारा परिसर भक्तीमय होऊन गेला.
सकाळच्या वेळी पावसाने काहिशी उसंत घेतल्याने विद्यार्थी व लोकांना बऱ्यापैकी आषाढीचा आनंद लुटता आला. परंतु 11 वा. नंतर पावसाने साखळीला अक्षरश: झोडपून काढले. त्याही पावसात दुपारपर्यंत लोकांनी हातात छत्री घेऊन रांगेत उभे राहून विठुरायाचे दर्शन घेतले. संध्याकाळी पावसाने सलगपणे जोरदार वृष्टी सुरूच ठेवल्याने भाविकांची गर्दी कमी झाली होती.