तालुक्याच्या इतिहासाच्या 90 हजार मतांचा टप्पा पार : 55 हजार मताधिक्य घेणारे पहिले आमदार
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर मतदारसंघातून भाजपचे विठ्ठल हलगेकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 91 हजार 834 इतके मतदान झाले आहे. 54 हजार 600 मतांची त्यांनी आघाडी घेत विजय मिळविला आहे. तर काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांना 37 हजार 205 इतकी मते मिळाली आहेत. विठ्ठल हलगेकर यांनी मोठी आघाडी घेतल्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यास सुऊवात केली.
सकाळी 8 वाजल्यापासून भाजपचे कार्यकर्ते खानापूर शहरात जमा झाले होते. मतमोजणीचा पहिला कल हाती आला त्यावेळी हलगेकर 15 हजार मतांची आघाडी घेतल्यानंतर तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शहरात दाखल झाले. दुपारी 3 नंतर विठ्ठल हलगेकर प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याचे घोषित केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गावागावातून विजयोत्सव साजरा करण्यास सुऊवात केली. त्यानंतर जांबोटी क्रॉस येथे बसवेश्वर पुतळ्यानजीक तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते जमा होऊन गुलालाची उधळण करून भाजपच्या विजयाच्या घोषणा देऊ लागले. त्यानंतर डीजेच्या ठेक्यावर ताल धरून नाचत होते. यात महिला कार्यकर्त्या तसेच युवा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.
सायंकाळी विठ्ठल हलगेकर हे निकाल प्रक्रिया पूर्ण करून बेळगावहून दाखल होताच जांबोटी क्रॉसवर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी जांबोटी क्रॉसवर असलेल्या जगत्ज्योती बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर वाहनातून वाजत-गाजत खानापूर शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजा छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. शिवस्मारक सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली. खानापूर शहरासह तालुक्मयातील अनेक कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. काहींनी भगवे फेटे परिधान केल्यामुळे परिसर भगवामय झाला होता. विठ्ठल हलगेकर आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. मोठ्या प्रमाणात गुलाल उधळल्यामुळे खानापूर शहरातील रस्ते गुलालमय झाले होते. खानापूर शहरात विठ्ठल हलगेकर यांचे ठीकठिकाणी आरती ओवाळून, फुले उधळून स्वागत करण्यात आले.
अरविंद पाटील फॅक्टर कामी आला
विठ्ठल हलगेकर यांच्या विजयात मोलाचा वाटा असलेले माजी आमदार अरविंद पाटील यांच्या सहकार्याने निवडणुकीचे चित्र बदलले आहे. माजी आमदार अरविंद पाटील यांनी गेल्या दीड वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी उमेदवारीसाठी जिकिरीचे प्रयत्न केले होते. मात्र भाजपने त्यांची उमेदवारी डावलून विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी अरविंद पाटील यांच्या हजारो समर्थकांनी अरविंद पाटील यांना अपक्ष निवडणूक लढविण्याची गळ घातली होती. मात्र अरविंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत हलगेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि संपूर्ण प्रचारात आघाडी घेत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपला मतदान करण्याचे जाहीर आवाहन करत प्रचाराची धुरा स्वत: सांभाळली. यामुळे समितीचा बालेकिल्ला असलेला खानापूर तालुका ढासळला. अरविंद पाटील यांच्यामुळे समितीचे मतदार भाजपकडे वळले गेले आहेत. हे विठ्ठल हलगेकर यांनी घेतलेल्या आघाडीवरून स्पष्ट होत आहे.
विठ्ठल हलगेकर यांनी 2018 साली भाजपमधून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र या पराभवाने खचून न जाता त्यांनी गेल्या पाच वर्षांत पुन्हा आपल्या समाजकार्याला सुऊवात केली होती. गेल्या तीन वर्षांपासून तर त्यांनी आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून समाजकार्यात झोकून दिले होते. विविध उपक्रम तसेच युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी राबविले होते. याच दरम्यान खानापूरचा साखर कारखाना त्यांनी महालक्ष्मी ग्रुपच्या माध्यमातून चालविण्यास घेतला. या माध्यमातूनही त्यांनी शेतकऱ्यांबरोबर संपर्क करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे तालुक्याच्या सर्व गावांतून त्यांचा संपर्क वाढला गेला. तसेच भाजपनेही गेल्या पाच वर्षांत संघटनात्मक कार्यावर भर देत, गावागावात भाजपच्या नव्या कार्यकर्त्यांची फळी उभारली. तसेच बुथ कमिटी, पेज प्रमुख, महिला प्रपोस्ट यासह इतर कमिटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत कार्यकर्त्यांना कायम कार्यरत ठेवले. यामुळे संपूर्ण तालुक्यात भाजप हा पक्ष घराघरात पोहोचला गेला. त्यामुळे भाजपला इतकी प्रचंड मतांची आघाडी घेता आली.
55 हजार मतांची आघाडी घेणारे तालुक्यातील पहिलेच आमदार
तालुक्यातील राजकारणात निवडणुकीच्या इतिहासात इतके मतदान घेणारे विठ्ठल हलगेकर हे पहिले उमेदवार ठरले आहेत. तसेच 55 हजार मतांची आघाडी घेणारे ते तालुक्यातील पहिलेच आमदार ठरले आहेत. या मताधिक्यात नव मतदारांसह 35 वयाच्या तरुणांच्या मतदानांचा टक्का अधिक आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप तालुक्यातील युवा मतदारांना आकर्षिक करण्यात यशस्वी ठरला आहे.
काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र या प्रचारात विकासाचा मुद्दा गौण ठरला असून हिंदुत्व आणि स्थानिक असा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने घेतला. जरी विठ्ठल हलगेकर यांनी प्रचंड मताधिक्य घेतले असले तरी काँग्रेसच्या उमेदवार विद्यमान आमदारांची मागील निवडणुकीतील मते 36 हजार होती. त्यापेक्षा दीड हजार मते त्यांनी जास्तीच घेतलेली आहेत. त्यामुळे त्यांचे मतदार हे त्यांच्याशी प्रामाणिक राहिले तर माजी आमदार अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे समितीचे मतदार पूर्णपणे भाजपकडे वळले. त्यामुळे समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील हे 10 हजार मताचा टप्पाही गाठू शकले नाहीत. तर जेडीएसचे नासीर बागवान यांनी मागील निवडणुकीत 28 हजार मते घेतली होती. त्यांनाही 10 हजार मतांमध्ये समाधान मानावे लागले.
जनमताचा कौल मला मान्य : काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर
खानापूर तालुक्यातील मतदारांनी दिलेला जनमताचा कौल मला मान्य असून तालुक्यातील 37 हजार मतदारांनी मला आशीर्वाद दिलेलाच आहे. त्याबद्दल प्रथमत: मी तालुक्यातील मतदारांची ऋणी आहे. नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचे मी हार्दिक अभिनंदन करत असून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. निवडणुकीतील हार, जीत ही साहजिकच आहे. मात्र तालुक्यातील जनतेवर विश्वास आणि माझा जिव्हाळा कायमच राहणार आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि काँग्रेस पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देते. तसेच पराभवाने खचून न जाता आम्ही सर्वजण पुन्हा खानापूरच्या जनतेच्या सेवेस रुजू होऊया, असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









