यात्रा स्पेशल सोडण्याकडे दुर्लक्ष : वारकऱ्यांमधून नाराजी
बेळगाव : आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. बेळगाव, खानापूर, चंदगड भागातील शेकडो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात. परंतु यावर्षी नैर्त्रुत्य रेल्वेला विठ्ठलभक्तांचा विसर पडल्याने वारकऱ्यांचा प्रवास खडतर होत आहे. आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर आली तरी यात्रा स्पेशल सुरू करण्यात आली नसल्याने वारकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी आषाढीसाठी हुबळीमधून यात्रा स्पेशल रेल्वेसेवा सुरू केली जात होती. मागील वर्षीही हुबळी ते पंढरपूर या दरम्यान यात्रा स्पेशल एक्स्प्रेस सोडण्यात आली. परंतु यावर्षी पंढरपूरला एकही यात्रा स्पेशल रेल्वे सोडण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता नैर्त्रुत्य रेल्वेने किमान दोन दिवस आधीतरी एक्स्प्रेस सुरू करणे गरजेचे होते. अनेक संघटनांनी अशी मागणीही केली होती. परंतु अद्यापही रेल्वे सुरू करण्याकडे नैर्त्रुत्य रेल्वेने दुर्लक्ष केले आहे.
वारकऱ्यांचे होताहेत हाल
थेट रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांना बेळगावमधून मिरज व तेथून पंढरपूर गाठावे लागत आहे. यामध्ये वेळ व पैसा वाया जात असल्याने विठ्ठलभक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दररोज शेकडो वारकरी रेल्वेने मिरज मार्गे पंढरपूरला जात असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. बसचे तिकीट परवडणारे नसल्याने वारकरी रेल्वेवर अवलंबून राहतात. परंतु रेल्वेच्या कारभारामुळे वारकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
कै. सुरेश अंगडीची वारकऱ्यांना आठवण
बेळगावचे माजी खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून दरवर्षी हुबळी, पंढरपूर मार्गावर यात्रा स्पेशल रेल्वे सोडली जायची. बऱ्याचवेळा वारकरी याचबरोबर सिटीझन्स फोरमने खासदारांकडे मागणी केल्यानंतर आषाढी एकादशीसाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात आली होती. यावेळी मात्र लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे वारकऱ्यांची गैरसोय झाली आहे.









