नॉर्वे बुद्धिबळ चॅम्पियनशिप ः चीनच्या वांग हाओला नमवत अव्वलस्थान कायम
ओस्लो-नॉर्वे / वृत्तसंस्था
भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील आपला बहारदार फॉर्म कायम राखत शुक्रवारी सलग तिसरा विजय मिळवला. त्याने चीनच्या वांग आहोला तिसऱया फेरीत पराभवाचा धक्का दिला. या विजयासह आनंदचे अव्वलस्थान अबाधित राहिले.
या स्पर्धेत सोमवारी झालेल्या लढतीत आनंदने जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित मॅग्नस कार्लसनविरुद्ध सनसनाटी विजय मिळवल्यानंतर माजी वर्ल्ड चॅम्पियन व्हॅसेलिन टोपालोव्ह, मॅक्झिमे लॅग्राव्हे व हाओ यांच्याविरुद्ध सलग लढतीत वर्चस्व गाजवले.
प्रारंभी, नियमित क्लासिकल लढत 39 चालीनंतर बरोबरीत राहिल्यानंतर 52 वर्षीय आनंदने आर्मागेडॉन (सडन डेथ गेम) जिंकत पूर्ण गुण वसूल केला. माजी वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या भारतीय ग्रँडमासटरने हाओला 44 चालीत मात दिली. या विजयासह तो 7.5 गुणांवर पोहोचला. अमेरिकेचा वेस्ले सो 6 गुणांसह अगदी किंचीत फरकाने दुसऱया स्थानी आहे. विद्यमान जगज्जेता मॅग्नस कार्लसन 5.5 गुणांसह तिसऱया स्थानी राहिला.
दिवसभरातील अन्य लढतीत प्रेंचमन लॅग्राव्हेने नॉर्वेच्या आर्यन तारीला पराभूत केले तर अनिश गिरीने वेस्ले सोसह बरोबरी नोंदवली. अनिश व वेस्ले यांच्यातील क्लासिकल व आर्मागेडॉन अशा दोन्ही लढतीत बरोबरीची कोंडी कायम राहिली. शखरियार मेमद्यारोव्हने टोपालोव्हला सडनडेथमध्ये पराभूत केले.
या क्लासिकल फेरीपूर्वी ब्लित्झ इव्हेंटमध्ये अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ले सो याने जेतेपद मिळवले होते. ब्लित्झ इव्हेंटच्या चौथ्या फेरीत आनंदने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला पराभूत केले होते. त्या इव्हेंटमध्ये आनंद चौथ्या स्थानी राहिला होता.









