प्रतिनिधी / कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानला पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सोमवारी भेट देऊन श्री शांतादुर्गा देवीचा आशीर्वाद घेतला. त्यांनी देवीला यावेळी ओटी अर्पण केली. पुजारी कमलाकर देसाई व रामचंद्र हेगडे यांनी खंवटे तसेच त्यांच्यासमवेत उपस्थित सर्वांना देवीचा प्रसाद दिला.
मंत्री रोहन खंवटे यांचा सोमवारी केपे मतदारसंघात दौरा आयोजिण्यात आला होता. त्याअंतर्गत त्यांनी बेतूल बंदर, ओएनजीसी कंपनी, पंचायती व पालिकेला भेटी दिल्या. यासाठी ते सकाळी आले असता आधी त्यांनी श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानला भेट देऊन देवीचा आशीर्वाद घेतला. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता तसेच केपे गटविकास अधिकारी अनिल नाईक, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाबू कवळेकर, केपे भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, फातर्पा सरपंच महेश फळदेसाई, पंच शीतल नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष खुशाली वेळीप तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपसिथत होते.
नंतर मंत्री खंवटे यांनी देवस्थान कार्यालयात भेट देऊन समितीशी संवाद साधला. देवस्थानचे अध्यक्ष कवेंद्र नाईक देसाई, सचिव विराज देसाई, खजिनदार दर्शन देसाई, मुखत्यार सुभाष देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच त्यांना देवीची प्रतिमा भेट दिली. देवस्थानाच्या विकासकामांसंबंधी खंवटे यांना नंतर समितीने निवेदनही सादर केले.









