पोळे चेकनाक्यावर व मठात उत्स्फूर्त स्वागत, दोन्ही मठांचे संबंध फार जुने : श्रीमद्विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज
प्रतिनिधी /काणकोण
शिर्सी, कर्नाटकातील सौदे वाडीराज मठाधीश श्रीमद् विश्ववल्लभतीर्थ स्वामी महाराजांचे पर्तगाळी मठात उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले. पर्तगाळी मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांनी पुष्पमाला घालून त्यांचे स्वागत केले. त्यापूर्वी पोळे चेकनाक्यावर पर्तगाळी मठाच्या अनुयायांनी सौदे वाडीराज मठाधीशांचे स्वागत केल्यानंतर खास मेंगलोर येथून आलेल्या वाद्यवृंदाच्या पथकाने पर्तगाळी येथे स्वामी महाराजांचे स्वागत केले.
त्यानंतर उभय स्वामी महाराजांनी श्री राम देव, श्री. वीरविठ्ठल यांचे दर्शन घेतल्यानंतर गुऊस्वामी श्रीमद् विद्याधिराजतीर्थ तसेच अन्य स्वामी महाराजांच्या वृंदावनांचे दर्शन घेतले. त्यानतंर श्रीमद् विद्याधिराज सभागृहात झालेल्या धर्मसभेच्या वेळी उभय स्वामी महाराजांची आशीर्वचने झाली. पर्तगाळी मठात सौदे वाडीराज मठाधिशांचे प्रथमच आगमन होत असून या ऐतिहासिक अशा भेटीने आपण कृतकृत्य झालेलो आहे. पर्तगाळी मठ आणि सौदे वाडीराज मठाचे संबंध फार जुने असून या भेटीने ते अधिकच दृढ झालेले आहेत. येथील वातावरण प्रसन्न आणि शांत असे असून सौदे वाडीराज मठाच्या वातावरणासारखेच आहे. हे बंधुत्वाचे नाते असेच वृद्धिंगत होत राहो, अशी सदिच्छा श्रीमद् विश्ववल्लभतीर्थ स्वामी महाराजांनी यावेळी व्यक्त केली.
भगवान हनुमंताने जसा राम-सीतेमधील कलह दूर करून दृढ संबंध निर्माण केले होते त्याचीच पुनरावृत्ती मुख्यप्राण देवाने पर्तगाळी मठात घडवून आणली आणि उभय मठांना वैभव प्राप्त करून दिले. सौदे वाडीराज मठाधीशांच्या ऐतिहासिक अशा भेटीने आपल्याला खूप समाधान झालेले आहे. सौदे वाडीराज मठाचे आणि पर्तगाळी मठाचे संबंध श्रीमद् पद्मनाभतीर्थ स्वामी महाराजांपासूनचे म्हणजे अत्यंत जुने असे आहेत, असे श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांनी सांगितले. यावेळी त्यांनी इंदिराकांततीर्थ स्वामी महाराजांपर्यंतचा इतिहास कथन केला. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली असून भक्तीशिवाय मुक्ती मिळत नाही. त्यामुळे भगवंताच्या भक्तीची जोड द्यायला हवी, असे ते म्हणाले. उभय मठांचे संबंध असेच टिकून राहतील, असे श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले.
नरसिंह आचार्य, गिरीश आचार्य, मुरलीधर आचार्य, संतोष आचार्य आणि नारायण भट यांच्या वेदघोषाने या धर्मसभेची स्थापना झाली. जगदीश पै यांनी स्वागत केले. योगेश कामत आणि जगदीश पै यांनी सौदे वाडीराज मठाधीशांचे, तर गुऊराज आचार्य, गोपालकृष्ण नायक, वरदाचार्य यांनी पर्तगाळी मठाधीशांचे शाल, पुष्पमाला घालून स्वागत केले. गुऊराज आचार्य यांनी सौदे वाडीराज मठाचा इतिहास आणि परंपरेविषयी माहिती दिली. वासुदेव कामत यांनी पर्तगाळी मठाविषयी माहिती दिली. धर्मसभेनंतर लगेच सौदे वाडीराज मठाधीशांनी मूळ गावी प्रयाण केले.









