1961 मधील लढाईतील आठवणींना दिला उजाळा
कारवार : 61 वर्षांपूर्वी पोर्तुगीज सत्तेशी संघर्ष करून येथून जवळचे सुप्रसिद्ध आणि निसर्गरम्य अंजदीव बेट भारताला मिळवून देणाऱ्या भारतीय नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी 61 वर्षांनंतर अंजदीव बेटाला भेट देऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, अशी माहिती भारतीय नौसेनेच्या सूत्रांनी दिली. काही वर्षांपूर्वी पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे अंजदीव (अंजदीप) बेट येथून काही किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. मैलभर लांब आणि अर्धा किलोमीटर रुंद आकाराचे हे खडकाळ बेट गोव्याच्या मुक्तीनंतर गोवा सरकारच्या ताब्यात होते. गेल्या काही वर्षांपर्यंत या बेटावर असलेल्या पोर्तुगीजकालीन चर्चच्या फेस्तसाठी गोव्यातील आणि येथील ख्रिश्चन मोठ्या संख्येने बेटावर दाखल होत होते. तथापि, आता हे बेट भारतीय संरक्षण खात्याने (सी-बर्डसाठी) ताब्यात घेतल्याने बेटावर येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तत्कालीन नौसेना निवृत्त अधिकारी एसएलटी कंसराज शर्मा एन. एम. चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. गोव्यातील वास्को येथील नौसेना दलाला भेट दिल्यानंतर सीबर्ड नौसेना दलाला भेट दिली. यावेळी त्यांनी पोर्तुगीज सत्तेला प्रत्युत्तर देऊन त्यांच्या तावडीतून हिसकावून घेतलेल्या अंजदीव बेटाला भेट दिली आणि 1961 मधील लढाईतील आठवणींना उजाळा दिला.
18 डिसेंबर 1961 रोजी शर्मा यांनी अन्य 75 नौसेनेच्या जवानांसह अंजदीवच्या स्वातंत्र्यासाठी ‘ऑपरेशन चटणी’ या मोहिमेत भाग घेतला होता. त्या ऑपरेशनच्यावेळी 7 नौसेना जवान हुतात्मा झाले होते आणि 19 नौसेना जवान जायबंदी झाले होते. तथापि, मोहीम फत्ते झाली होती. या मोहिमेबद्दल ‘आठ गॅलंटरी अवॉर्ड्स’ देण्यात आले होते. यामध्ये तीन कीर्ती चक्रांचा, चार शौर्य पदकांचा व एक नौसेना पदकाचा समावेश होता. 150 एडी पासून या बेटाला इतिहास लाभलेला आहे. या बेटावर पोर्तुगीज, ग्रीक आणि ब्रिटिश या परकीय राजवटीसह कदंबा, चालुक्य, आदिलशाही या राजवटींच्या युद्धनौका आणि व्यापारी जहाजांना आसरा देण्यात आला होता. अरबी समुद्रातील हे बेट 1498 पासून 1961 पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. तथापि 1662 ते 1665 या कालावधीत हे बेट ब्रिटिशांच्या ताब्यात होते. शर्मा यांनी कर्नाटक नेवल एरियाचे रियर अॅडमिरल के. एम. रामकृष्णन, नौसेनेचे अन्य अधिकारी आणि जवानांशी संवाद साधला आणि 18 डिसेंबर 1962 मधील नौसेनेच्या कारवाईच्या आठवणींना उजाळा दिला.









