नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्या उपस्थितीत सोहळा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तब्बल 32 वर्षांच्या सेवेनंतर नौदलाचा निरोप घेत ‘आयएनएस कृपाण’ ही युद्धनौका भारतीय नौदलाने व्हिएतनामला भेटीदाखल सुपूर्द केली आहे. व्हिएतनाममध्ये शनिवारी एका समारंभात नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी व्हिएतनाम पीपल्स नेव्हीच्या प्रमुखांना ‘आयएनएस कृपाण’ प्रदान केले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील घट्ट मैत्रीचा हा पुरावा असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी करण्यात आले. या युद्धनौकेमुळे दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनामची ताकद वाढणार आहे.
चीनच्या लष्कराने एलएसीवरील स्थिती बदलण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रात चीन सातत्याने आक्रमक वृत्ती दाखवत असल्यामुळे इतर देशांसाठी ती मोठी समस्या बनत आहे. चीन आणि व्हिएतनाममध्येही सीमा विवाद आहे. व्हिएतनामची उत्तर सीमा चीनशी आहे. अशा परिस्थितीत समुद्री सुरक्षेसाठी ‘आयएनएस कृपाण’चा मोठा लाभ होणार आहे.
भारत आणि व्हिएतनाममधील संबंध सौहार्दपूर्ण आहेत. 1979 च्या चीन-व्हिएतनाम युद्धात भारताने व्हिएतनामला मदत केल्यामुळे चीनला त्याचा फटका सहन करावा लागला होता. भारताची रणनीती चीनसारखी कधीच विस्तारवादाची नव्हती, परंतु व्हिएतनामला भेट दिलेली ‘आयएनएस कृपाण’ अनियंत्रित ड्रॅगनला घेरण्यात उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.