बैठकीत कार्यकर्त्यांना प्रचारासंदर्भात मार्गदर्शन
खानापूर : काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी मनिकंठ व जिल्हा प्रभारी निजामुद्दीन काजी यांनी खानापूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन खानापूर मतदारसंघात काँग्रेसची वाटचाल तसेच रविवारी होणाऱ्या प्रियांका गांधी यांच्या सभेच्या तयारीविषयी माहिती घेऊन कार्यकर्त्यांना प्रचारासंदर्भात मार्गदर्शन केले. काँग्रेसच्या उमेदवार आमदार अंजली निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर, जिल्हा अध्यक्ष बसवराज नावलकट्टीसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे निवडणूक प्रभारी मनिकंठ तसेच निजामुद्दीन काजी यांनी खानापूर मतदारसंघात भेट देवून खानापूर काँग्रेस पक्षाच्या वाटचालीसंदर्भात माहिती घेतली. यावेळी त्यांनी पुढील प्रचारयंत्रणा कोणत्या पद्धतीने राबविण्यात यावी, मतदारांशी संपर्क कसा साधावा, तसेच काँग्रेसने जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या आश्वासनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, तसेच या आश्वासनांची काँग्रेस पक्ष सत्तेत आलेल्या एक महिन्यात पूर्तता करण्यात येणार असल्याने मतदारांना विश्वासात घेऊन काँग्रेसला मतदान करण्यासाठी आवाहन करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची जाहीर सभा रविवारी खानापुरात होणार असल्याने यासंदर्भातील तयारी व नियोजनाबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच जाहीर सभेच्या बाबतीत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. यावेळी उमेदवार अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. आणि काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे आश्वासन दिले.









