भरतेश एज्युकेशन ट्रस्टमध्ये विविध धार्मिक अल्पसंख्याकांशी संवाद कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र कुमार जैन, आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांनी शनिवारी बेळगावला भेट देऊन विविध धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
भरतेश एज्युकेशन ट्रस्ट बेळगाव येथे विविध धार्मिक अल्पसंख्याकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नरेंद्रकुमार जैन यांनी या संवादात अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांशी संबंधित विविध समस्या आणि अल्पसंख्याकांचा दर्जा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, अनुदान, शिष्यवृत्ती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी आदींसह अल्पसंख्याकांच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा केली.
यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांनी अल्पसंख्याक संघटनांना त्यांचे हक्क व योजनांबाबत मार्गदर्शन केले. माजी आमदार संजय पाटील यांनी अध्यक्षांनी अल्पसंख्याकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली. भरतेश शिक्षण संस्थेचे सचिव विनोद दो•ण्णावर यांनी अल्पसंख्याकांचा दर्जा मिळण्याच्या मुद्द्यावर विशेषत: मायक्रो अल्पसंख्याकांसाठी माहिती दिली आणि संबंधित आकडेवारीचा उल्लेख केला.
शासनाच्यावतीने जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी मिरजन्नावर यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. भरतेश शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे आदी उपस्थित होते. यावेळी जैन, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख धर्मीय संचालित जिल्ह्यातील विविध अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांनी आपल्या समस्या मांडल्या आणि निवेदन दिले. आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र कुमार जैन यांनी त्यांच्या समस्या आयोगासमोर मांडण्याचे आश्वासन दिले.









