शासकीय कागदपत्रांसाठी धावपळ : लॉगइनची प्रतीक्षा
बेळगाव : काँग्रेसने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे आवश्यक आहेत. यासाठी सायबर केंद्रावर व कर्नाटक वनमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. शक्ती योजनेला प्रारंभ झाला आहे. त्यापाठोपाठ आता गृहज्योती, गृहलक्ष्मी योजना अमलात येणार आहेत. यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. बेळगाव वन, कर्नाटक वन व इतर सायबर केंद्रांवर नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास, गृहलक्ष्मीअंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक दोन हजार रुपये, गृहज्योती योजनेंतर्गत 200 युनिट मोफत वीज, अन्नभाग्य योजनेंतर्गत माणसी दहा किलो धान्य, युवानिधीअंतर्गत पदवीधरांना आर्थिक साहाय्य आदी योजना लागू होणार आहेत. यासाठी शासकीय कागदपत्रे महत्त्वाची आहेत. रेशनकार्ड, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक आदी कागदपत्रे महत्त्वाची आहेत. त्यामुळे शासकीय कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे. गॅरंटी योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सायबर केंद्रांवर आणि बेळगाव वन व कर्नाटक वनमध्ये गर्दी होणार आहे. या संधीचा फायदा घेऊन एजंटांचा सुळसुळाट देखील वाढणार आहे. नवीन रेशनकार्डचे कामकाज बंद आहे. शिवाय नवीन अर्ज स्वीकृतीदेखील स्थगित आहे. त्यामुळे अंत्योदय आणि बीपीएल कार्ड काढणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे.
एजंटांचा सुळसुळाट वाढणार
काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे आवश्यक आहेत. दरम्यान, या कागदपत्रांची मागणी वाढू लागली आहे. या संधीचा फायदा घेऊन एजंटांचा सुळसुळाट वाढणार आहे. आवश्यक कागदपत्रे काढून देण्यासाठी एजंटांकडून पैशांची मागणी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.
लॉगइन आयडीची प्रतीक्षा
गृहलक्ष्मी आणि इतर योजनांसाठी पात्र लाभार्थी मोबाईलद्वारे अर्ज करू शकतात. सेवासिंधू पोर्टलद्वारे अर्ज करणे सोयिस्कर होणार आहे. मात्र, यासाठी लॉगइन आयडी महत्त्वाचा आहे. मात्र, अद्याप लॉगइन आयडी आलेला नाही. त्यामुळे सर्वांना सेवासिंधू पोर्टलच्या लॉगइन आयडीची प्रतीक्षा लागली आहे. विशेषत: ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी सायबर केंद्र व ग्रामवनमध्ये गर्दी होणार आहे. त्यामुळे सायबर केंद्राच्या मालकांना मोठे उत्पन्न प्राप्त होणार आहे.
पुढील आठवड्यापासून कामकाज सुरू होणार
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2014 नुसार कुटुंबातील ज्येष्ठ महिला शिधापत्रिकेत कुटुंबप्रमुख आहेत. जिल्ह्यातील सर्व अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकांमध्ये 100 टक्के महिला प्रमुख आहेत. रेशनकार्ड दुरुस्ती व नवीन रेशनकार्डसाठी पुढील आठवड्यापासून कामकाज सुरू होणार आहे.
– श्रीशैल कंकणवाडी (सहसंचालक अन्न व नागरीपुरवठा खाते)









