पुणे :
वेगाने प्रगती करीत असलेल्या पुण्यातील विश्वेश्वर सहकारी बँकेला नुकत्याच मिळालेल्या ‘शेड्युल्ड’ दर्जाच्या पार्श्वभूमीवर त्यांची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पारंपरिक व सणासुदीच्या पेहरावात आनंददायी वातावरणात संपन्न झाली. डी. पी. रस्त्यावरील गोल्डन लीफ लॉन्स येथे झालेल्या या सभेसाठी विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे, उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे, तज्ञ संचालक मनोज साखरे, संचालक दत्तात्रय कामठे, अमोल मणियार, सुभाष लडगे, अजय डोईजड, श्रेयश रुकारी, रवींद्र महाजन, सुलभा कोकाटे, रत्ना कसबेकर, तज्ञ संचालक डॉ. चिंतामणी वैजापूरकर, व्यवस्थापन सदस्य सुनील फाटक, भालचंद्र परांजपे, चंद्रशेखर जोशी उपस्थित होते.
गेल्या 4-5 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर देशातील 50 वी ‘शेड्युल्ड नागरी सहकारी बँक’ होण्याचा सन्मान मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वजण वार्षिक सभेसाठी सणासुदीच्या पोशाखात हजर होते. सभास्थळी करण्यात आलेल्या फुलांच्या सजावटीने वातावरण आणखी महोत्सवी झाले होते. पेढे देऊन स्वागत झाल्यानंतर प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देत बँकेचे यश साजरे करताना दिसत होता.
सभेस उपस्थित ज्येष्ठ सभासद व बँकिंग तज्ञ बाळासाहेब अनास्कर यांनी शेड्युल्ड दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन ठराव मांडला. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी बँकेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत सर्व माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सत्कार केला. बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीचे सादरीकरण करताना व्यवस्थापनाने शिफारस केलेल्या 10 टक्के लाभांशाला सभागृहाने टाळ्यांच्या गजरात मान्यता देत, पुढील वर्षी जादा लाभांश देण्याची मागणी केली.
अध्यक्षीय भाषणात गाडवे यांनी सर्व सभासदांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचे सर्व व्यवहार विश्वेश्वर बँकेच्या माध्यमातून करण्याचे आवाहन केले. लवकरच विश्वेश्वर बँकेला देशातील क्रमांक एकची नागरी सहकारी बँक म्हणून मान्यता देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. गेल्या पाच वर्षांच्या रिझर्व्ह बँकेच्या तपासणी अहवालात कोणत्याही नियमांच्या उल्लंघनाचा शेरा आपल्यावर नसल्याचे अभिमानाने सांगत यापुढे अशीच आर्थिक शिस्त पाळली जाईल, असे आश्वासनही गाडवे यांनी सर्वांना दिले.
बँकेचे माजी अध्यक्ष सुनील रुकारी, सुरेंद्र गाडवे, बापूसाहेब धनकवडे, कुमारपाल बोरा आदी सभासदांनी बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा देत संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. यावेळी विश्वेश्वर बँकेच्या वाटचालीवर आधारित शाहीर श्रीकांत रेणके यांनी सादर केलेला पोवाडा लक्षवेधी ठरला. उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे यांनी आभार मानले तर पसायदानाने सभेचा समारोप झाला.









