कोल्हापूर / धीरज बरगे :
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) अध्यक्ष बदल करण्याचा निर्णय झाला असून पुढील वर्षभरासाठी आमदार सतेज पाटील गटाला संधी मिळणार आहे. पाटील गटाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि बाबासो चौगले यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. निवडणूक तोंडावर असल्याने अनुभवी व खमक्या अध्यक्ष असणे गरजेचे आहे. या रणनितीमधून विश्वास पाटील की बाबासो चौगले की अन्य कोणी तिसरा अध्यक्ष होणार याबाबत गोकुळ वर्तुळात उत्सुकता रंगली आहे.
गोकुळमधील माजी आमदार महादेवराव महाडिक आणि स्व. आमदार पी. एन. पाटील यांच्या सुमारे 35 वर्षांच्या एकहाती सत्तेला मागील निवडणुकीत सुरुंग लावण्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना यश आले. 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवित त्यांनी गोकुळमध्ये एकहाती सत्ता मिळविली. या सत्तांतरात ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामुळे या दोन्ही ज्येष्ठ संचालकांना प्रथम दोन–दोन वर्ष संधी देण्याचे ठरले. त्यानुसार सतेज पाटील यांनी पहिली दोन वर्ष विश्वास पाटील यांना तर हसन मुश्रीफ यांनी त्यानंतर पुढील दोन वर्ष अरुण डोंगळे यांना अध्यक्षपदी संधी दिली. आता मे 2025 च्या अखेरीस विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांची ठरवून दिलेली दोन वर्षांची मुदत संपणार आहे.
अऊण डोंगळे यांनी तिसऱ्या वर्षीही चेअरमनपद आपणाकडे रहावे यासाठी फिल्डींग लावली आहे. मात्र सतेज पाटील गटाकडे चेअरमनपद जाणार असल्याने डोंगळे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते. ना. हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यात काही नव्या राजकीय जोडण्या झाल्या तर आणि तरच अऊण डोंगळे म्हणजे पर्यायाने मुश्रीफ गटाकडे एक वर्षाचे चेअरमनपद जाऊ शकते. मात्र, महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेसह बाजार समितीच्या राजकारणात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील मैत्रीची समझोता एक्सप्रेस धावत आहे, ते पाहता, गोकुळमध्ये हे दोघे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. चेअरमनपदासाठी दोघांपैकी कोणी हट्टवादी भूमिका घेण्याची शक्यता धुसर आहे. याला मागील पाच वर्षात राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलाचे पूल आहेत. त्यामुळेच गोकुळ नूतन चेअरमनपद हे येऊ घातलेल्या निवडणुकीच्या रणनिताचा एक भाग असणार आहे.
- निवडणुकीमुळे विश्वास पाटील यांना संधी शक्य
पुढील वर्षभरासाठी गोकुळचे अध्यक्षपद आमदार सतेज पाटील गटाकडे जाणार हे निश्चित आहे. वर्षभरातच गोकुळची निवडणूक होईल. विश्वास पाटील आणि अऊण डोंगळे यांच्याकडे गोकुळचे सर्वाधिक वैयक्तिक ठराव आहेत. मागील निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला या दोघांनी सोडचिठ्ठी दिल्यानेच सत्तांतर शक्य झाले. विश्वास पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व मानले तर डोंगळे यांनी हसन मुश्रीफ हे आपले राजकीय गुरू असे जाहीर केले होते. या दोघांनीही आघाडीत येण्यापूर्वी चेअरमनपदाची अट घातली होती. ती दोन्ही नेत्यांनी पूर्ण केली.
निवडणूक वर्षात वजनदार अध्यक्ष असावा हे कोणत्याही आघाडीचे धोरण असते. सुक्ष्म नियोजन कऊन शांतपणे निवडणूक हाताळण्यात विश्वास पाटील यांचा हातखंडा मानला जातो. त्यांच्या घरात आणि पाहुण्यामध्येच सर्व ठराव आहेत. त्यामुळे त्यांचे ठरावधारक एकगठ्ठा मतदान करत असल्याचा यापूर्वीच्या मतदानाचा अनुभव आहे. सतेज पाटील यांचे ते अत्यंत निकटचे शिलेदार मानले जातात. पहिल्या दोन वर्षाच्या चेअरमपदाच्या काळात ठेकेदार बदलण्याची प्रकिया करत असताना विरोधी महाडिक गटाला त्यांची तितक्याच शांतपणे आणि यशस्वी टक्कर दिली होती. या सर्वाचा परिपाक म्हणून अध्यक्षपदी पुन्हा विश्वास पाटील यांनाच संधी मिळण्याची दाट शक्यता आाहे.
- बाबासो चौगले, नरके बंधूही चर्चेत
अध्यक्ष पदासाठी बाबासो चौगले हे नाव आघाडीवर आहे. सतेज पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून चौगले परिचित आहेत. मागील संचालक मंडळातही सतेज पाटील यांच्या कोट्यातून चौगले यांना संधी मिळाली होती. आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. राज्य सरकारचा पाठिंबा आणि निवडणुकीतील आघाडीचे धक्कादायक राजकारण म्हणून अजित नरके यांचेही नाव पुढे येऊ शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून बिनशर्त माघार घेत डॉ. चेतन नरके यांनी शाहू छत्रपती यांना पाठींबा दिला होता. चेतन नरके हे विरोधी आघाडीतून निवडून आले होते. अभ्यासू चेहरा आणि गोकुळचे सलग दहावर्षे चेअरमन राहिलेल्या अऊण नरके यांचे पाठबळ यामुळे चेतन नरके यांनाही सतेज पाटील संधी देतील अशी अटकळ बांधली जात आहे. चेअरमनपदावऊन खूपच ताणाताणी झाली अन् आघाडीत बिघाडी नको, असा विषय पुढे आल्यास नवा चेहराही चेअरमनपदावर आल्यास आश्चर्य वाटायला नको.
- संचालक मंडळाची उद्याची बैठक महत्त्वपूर्ण
गोकुळमध्ये अध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. खासगीत अनेकवेळा नेत्यांनी चेअरमन बदलणार असल्याचे सांगितले आहे. अध्यक्ष बदलासाठी उद्या गुरुवार 15 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अऊण डोंगळे यांचा राजीनाम्याचा निर्णय होऊ शकतो. या बैठकीमध्ये विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे पदाचा राजीनामा देणार की नेत्यांकडे सुपूर्द करणार याकडे गोकुळ परिवाराचे लक्ष आहे.








