1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान सातारा येथे रंगणार साहित्य सोहळा
प्रतिनिधी / पुणे
सातारा येथे 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
साहित्य महामंडळाची बैठक पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. दादा गोरे, रामचंद्र काळून्खे, देविदास फुलारी, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, विलास मानेकर, मराठी साहित्य परिषद, तेलंगणाच्या डॉ. विद्या देवधर, छत्तीसगड मराठी साहित्य संघाचे कपूर वासनिक, मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाचे पुरुषोत्तम सप्रे, मराठी वाड्.मय परिषद, बडोदाचे संजय बच्छाव, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे रमेश वंसकर हे घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाहीत.
प्रा. जोशी म्हणाले, ‘घटक संस्थांनी तसेच महामंडळातील सर्व समाविष्ट, संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने सुचविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने संमेलनाचे आयोजन केले असल्याने पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोणाचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचविले नाही. संस्थांकडून शिफारस करण्यात आलेल्या नावातून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सभेत मतदान घेण्याची वेळ आली नाही. अध्यक्षांनाही त्यांचे मत नोंदवावे लागले नाही.
पाटील यांना महत्त्वाचे सन्मान व पुरस्कार
पाटील यांना त्यांच्या साहित्य योगदानासाठी विशेषत: ‘झाडाझडती‘ आणि ‘नागकेशर‘ या कादंबऱ्यांसाठी इंदिरा गोस्वामी साहित्य राष्ट्रीय पुरस्कार (आसाम) प्राप्त झाला. यापूर्वी हा मान महाश्वेता देवी आणि भैरप्पा यांसारख्या नामवंत लेखकांना मिळाला होता. ‘झाडाझडती‘ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ही कादंबरी मोठ्या धरणांमुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या जीवनावर व त्यांच्या पुनर्वसनाच्या समस्येवर आधारित असून भारतातील तिचा अनेक भाषांत अनुवाद झाला आहे.
सामाजिक आणि राजकीय कादंबऱ्या
‘लस्ट फॉर लालबाग‘, ‘पांगीरा‘, ‘नागकेशर‘ ‘दुडिया‘, ‘ग्रेट कांचना सर्कस‘, ‘गाभूळलेल्या चंद्रबनात‘, ‘आंबी‘, ‘रणखंदळ‘ या त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कादंबऱ्या गाजल्या. तर, ‘संभाजा‘ आणि ‘पानिपत‘ या ऐतिहासिक कादंबऱ्यांना अफाट लोकप्रियता लाभली. ‘महानायक‘, ‘महासम्राट‘ या कादंबऱ्याही गाजल्या.
‘पानिपतचे रणांगण‘ ही पानिपत कादंबरीवर आधारलेली पाटील यांची नाट्याकृती रंगमंचावर 2000 मध्ये आली. देशात व विदेशात 700 प्रयोग झालेले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी या नाट्याकृतीचे दिग्दर्शन केले होते. आपल्या साहित्यिक कार्याबरोबरच पाटील यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केवळ 14 महिन्यांत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम पूर्ण केले.
‘नाथ माधव पुरस्कार‘, प्रियांदर्शनी राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय ‘भाषा परिषद पुरस्कार‘, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार‘, ‘विखे पाटील पुरस्कार‘ ‘साहित्य अकादमी पुरस्कार‘, ‘रोहमारे साहित्य पुरस्कार‘, राज्य शासन सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार. ‘राज्य शासन सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार‘, ‘जयवंत दळवी पुरस्कार‘ ‘सर्वोत्कृष्ट नाटक शासन पुरस्कार ‘पानिपतची रणांगण‘ ‘महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, चंद्रमुखी कादंबरीसाठी ‘सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार‘, ‘राज्य शासन चित्रपट समीक्षण पुरस्कार‘, ‘सर्वोत्तम मराठी लेखक म्हणून लाभसेटवार पुरस्कार‘, ‘सर्वोत्कृष्ट मराठी लोकप्रिय लेखक‘, वाचकांच्या पसंतीचा सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक पुरस्कार असे विविध पुरस्कारांनी पाटील यांना सन्मानित करण्यात आले आहे.








