केएलएस संस्था सातत्याने दर्जेदार प्रगतीसाठी प्रयत्नशील
प्रतिनिधी / बेळगाव
हल्याळ येथील केएलएस विश्वनाथ देशपांडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला नॅक समितीने पहिल्याच फेरीत अ श्रेणीचा दर्जा दिला आहे. सदर कॉलेजने चारपैकी 3.16 च्या सीजीपीएसह मूल्यमापनाच्या पहिल्या फेरीत राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद म्हणजेच नॅककडून अ श्रेणी मिळवून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. नॅक समितीने 7 आणि 8 जुलै रोजी कॉलेजमधील शैक्षणिक सुविधा, प्रगती व सामाजिक योगदान यांचे मूल्यमापन केले आणि त्या अहवालावर आधारित नॅकने ही श्रेणी संस्थेला बहाल केली. गेल्या पाच वर्षांत सदर संस्था सातत्याने दर्जेदार प्रगतीसाठी प्रयत्नशील असून संस्थेने 19 पेटंट, 100 हून अधिक शोधनिबंधांचे प्रकाशन, 60 लाखांचे संशोधन अनुदान आणि खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर 10 हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व केले आहे. कॉलेजने केलेल्या प्रयत्नपूर्वक कामगिरीमुळे ही श्रेणी लाभल्याचा आनंद आहे, असे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष विनायक लोकूर यांनी स्पष्ट केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. कुलकर्णी यांनी ही श्रेणी मिळाल्याबद्दल नॅकला धन्यवाद दिले.









