जिल्हा प्रशासनाकडून विश्वकर्मा जयंती साजरी
बेळगाव : श्री विश्वकर्मा समुदायाकडून पूर्वीच्या काळात कोणतेच उपकरण नसताना दगड, लाकूड, लोखंड आणि सोन्याच्या वस्तूंपासून सुंदर कलाकृती तयार करून समाज सुंदर बनविण्यात या समुदायाचे मोठे योगदान आहे. या समाजाने शिक्षणाची कास धरावी, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक खाते व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात रविवारी श्री विश्वकर्मा जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. विश्वकर्मा समुदायाकडून शेतकऱ्यांना आवश्यक असणारी अवजारे, मंदिरांमधील मूर्ती, कालवे निर्माण करणे, दैनंदिन वापरातील वस्तू, महिलांच्या वापरातील वस्तू, अशा अनेक समाजोपयोगी वस्तू निर्माण करून समाजाला मोठी देणगी दिली आहे. या समुदायाने आपल्या पारंपरिक व्यवसायाबरोबरच शिक्षणाला अग्रक्रम द्यावा, उच्च शिक्षण घ्यावे, मोठ्या पदांवर विराजमान व्हावे, तरच विश्वकर्मा जयंती साजरी करण्याला परिपूर्ण अर्थ येईल, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. जग सुंदर दिसण्यासाठी विश्वकर्मा समुदायाकडून अनेक सुंदर वस्तू निर्माण केल्या आहेत. विविध क्षेत्रांमध्ये पारंगत होऊन विकास करून घ्यावा. याबरोबरच त्यांनी आपले जीवनही सुंदर करून घ्यावे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी आमदार राजू शेठ होते. ‘आपल्या सरकारकडून अनेक विकासाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ करून घ्यावा’, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कला शिक्षक गुंडोपंत पत्तार यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, समितीचे अध्यक्ष राघवेंद्र हावनूर, महिला समिती अध्यक्ष ज्योती सुतार, जिल्हा विश्वकर्मा निगमचे निर्देशक बसवराज सुतार आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी किल्ला तलाव येथील अशोक चौक येथून विश्वकर्मा चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. तहसीलदार बसवराज नागराळ यांच्या हस्ते मिरवणुकीला चालना देण्यात आली.









