केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : पर्यटन मंत्रालयातर्फे पीएम विश्वकर्मा योजनेचा राज्यस्तरीय लॉन्च कार्यक्रम
पणजी : पंतप्रधान विश्वकर्मा योजना देशातील पारंपरिक कारागीर आणि कारागिरांना प्रोत्साहन आणि संरक्षण देईल जे प्रतिकूल परिस्थितीमुळे पारंपरिक व्यवसाय करण्यास इच्छुक नाहीत त्यांना स्वालंबी करण्यासाठी ही योजना साहाय्य करेल. तसेच ही योजना तऊणांना त्यांच्या पारंपरिक व्यापारात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करते. यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी वित्तपुरवठा करणे आणि त्यांची कौशल्ये वाढविण्यासाठी प्रशिक्षण घेणे सोपे होईल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त पारंपरिक कारागीर आणि कारागिरांसाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली. त्याचाच भाग असलेला कार्यक्रम पणजीतील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार सदानंद शेट तानावडे, कृषीमंत्री रवी नाईक, अधिकारी डॉ. व्ही. कांदेवेलू, अरविंद बुगडे, मुकेश कुमार मीना, आयुषी कुमारी आदी उपस्थित होते.
मंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, सर्वसमावेशकता या योजनेचा उद्देश आहे. पारंपारिक कामात गुंतलेले कारागीर कधीकधी व्यवसाय सुरू ठेवण्यास संकोच करतात. पीएम विश्वकर्मा योजना त्यांना त्यांच्या कामावर टिकून राहण्यासाठी प्रोत्साहित करेल. तसेच कोणत्याही व्यवसायासाठी भांडवल ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे पारंपरिक कारागिरांनी व्यवसाय वाढविण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी देशाची सेवा करताना ‘अंत्योदय’ तत्त्वाचे पालन करत आहेत. पंतप्रधान नेहमीच समाजातील उपेक्षित घटकांचा विचार करतात. पीएम विश्वकर्मा योजना ही कारागिरांना समाजासोबत वाढण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत विश्वकर्मा योजना 13,000 कोटी ऊपयांच्या खर्चासह केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे निधी पुरवली जाते. पारंपरिक कौशल्यांचे जतन आणि संवर्धन करणे, कारागिरांना सक्षम करणे आणि भारताच्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.









