बेळगाव : चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समिती आयोजित 26 वी चुडाप्पा हलगेकर भव्य कुस्ती मैदानात कराडच्या विश्वजीत रुपनरने कर्नाटक चॅम्पियन प्रकाश इंगळगीला 21 व्या मिनिटाला गुणावर पराभव करुन विमल ग्रुप केसरी किताब पटकाविला. तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत बेळगावचा उगवता तारा पार्थ पाटीलने सांगलीच्या आदित्य पाटीलचा 9 व्या मिनिटाला एकलांगीवर आसमान दाखवित उपस्थित 10 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती सायंकाळी 8.38 कर्नाटक चॅम्पियन प्रकाश इंगळगी व कराड खंडेराजुरीचा विश्वजीत रुपनर ही कुस्ती माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, डॉ. गणपत पाटील, गुलाब जंगू शेख, डॉ. समीर शेख, बळाराम पाटील, कर्नाटक केसरी कृष्णा पाटील, अशोक हलगेकर व चुडाप्पा हलगेकर कुस्ती समितीच्या सभासदांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला प्रकाश इंगळगीने एकेरी पट काढून विश्वजीतला खाली घेतले व घीस्स्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण बलदंड शरीराच्या विश्वजीतला फिरविणे कठीण झाले.

7 व्या मिनिटाला दुहेरी पट काढून प्र्रकाशने विश्वजीला खाली घेत घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून विश्वजीतने सुटका करुन घेतली. 15 व्या मिनिटाला विश्वजीत रुपनरने दुहेरी पट काढून प्रकाशला खाली घेत मानेचा कस काढीत घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून प्रकाशने सुटका करुन घेतली. 20 मिनिटांपर्यंत कुस्तीचा निकाल लांबल्याने पंचांनी कुस्ती गुणावर निकाली करण्याचा निर्णय घेतला. 22 व्या मिनिटाला प्रकाशने पटात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना पायाला आकडी लावून विश्वजीतने प्रकाशवर ताबा मिळवित गुण संपादीत करीत विजय मिळविला. त्याला मान्यवरांच्या हस्ते विमल ग्रुप केसरी हा किताब देण्यात आला.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती गुलाब जंगू शेख व डॉ. समीर शेख पुरस्कृत ही कुस्ती बेळगावचा उगवता तारा पार्थ पाटील कंग्राळी, कौठेपिरानचा आदित्य पाटील ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला पार्थ पाटीलने एकेरी पट काढून आदित्य पाटीलला खाली घेतले. पण आदित्यने खालून डंकी मारुन त्यातून सुटका करुन घेतली. चौथ्या मिनिटाला पार्थने एकेरी पट काढून आदित्यला खाली घेत घीस्स्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण वजनाने भारी असलेल्या आदित्यला फिरवणे कठीण गेले. 7 व्या मिनिटाला पार्थ पाटीलने दुहेरी पट काढून आदित्यला खाली घेत पायाला एकलांगीची मजबूत पकड घेत एकलांगीवर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न 9 व्या मिनिटाला पूर्ण करुन आदित्यला चारीमुंड्या चीत करीत उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली.

तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील कंग्राळीने समर्थ खडकलाट गोडगेरी यांच्यात झाली. या कुस्तीत 4 थ्या मिनिटाला पृथ्वीराज पाटीलने समर्थला सवारी भरुन झोळीवरती चीत करुन विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमेश हट्टीकरने विकास अंकलगी गोडगेरीचा घीस्स्यावरती नेत्रदीपक विजय मिळविला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत निखील पाटील कंग्राळी, हनमंत घटप्रभा ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंझली. पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत झाली.
सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत रमेश अथणी भांदुर गल्ली याने महेश बिर्जे तिर्थकुंडे याचा लाटने डावावरती पराभव केला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत विनायक येळ्ळूर व साईनाथ नाईक कंग्राळी ही कुस्ती बरोबरीत राहिली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत रामदासने भूमीपूत्र मुतगेचा घीस्सा डावावरती पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत लोकेश चिकोडीने भरत मुतगेचा एकचाक डावावर पराभव केला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्ती श्रीकांत शिनोळीने चेतन येळ्ळूरवर झोळी डावावर विजय मिळविला. त्याचप्रमाणे अनिल तलवार एकचाकवर, श्री घाडीने एकचाकवर, केशव सांबराने डंकीवर, लगमन्ना बसापूरने घीस्सावर, संभाजी परमोजी काकतीने घुटण्यावर तर सागर पाटील जाफरवाडीने एकचाकवर नेत्रदीपक विजय मिळविला. यामध्ये मैदानात सिद्धार्थ सांबरा, हर्षद नाईक, उमेश सौंदत्ती, श्री पाटील कंग्राळी, कुणाल बेन्नाळकर, संग्राम मोदेकोप यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
कुस्तीचे समालोचन राजू मुचंडी, पुंडलिक पावशे यांनी केले. तर कुस्ती मैदानात यळगूडच्या ओमकार दाभाडे यांनी आपल्या रणालगीच्या तालावर सर्व कुस्तीशौकिनांना खिळवून ठेवले. आखाड्यातील पंच म्हणून कृष्णा पाटील, मारुती घाडी, बळाराम पाटील, ए. जे. मंतुरगी, नवीन पाटील, बसवराज घोडगेरी, पांडुरंग पाटील, यलाप्पा हरजी, पिराजी मुचंडीकर, सुरेश पाटील आदींनी काम पाहिले. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी चुडाप्पा हलगेकर कुस्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









