अध्याय सविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा समोर दिसणारा प्रत्येकजण भगवंताचे रूपच आहे अशी समदृष्टी हाती येण्याकरिता भक्तिभावाने भगवंताचे भजन करत रहावे. असे केल्याने सर्वत्र ईश्वरी अस्तित्व जाणवत राहते आणि त्याप्रमाणात इतरांच्या व शेवटी स्वतःच्याही अस्तित्वाचा विसर पडतो. देही असून विदेही अशी ही अवस्था असते. यासाठी सर्वत्र ईश्वर पाहण्या बरोबरच, अहंता व ममता निखालस सोडून दिली पाहिजे. देहाचा अभिमान वाटू लागला म्हणजे ती अहंता ‘मीपणा’ वाढविते आणि त्या मीपणाने देहाशी संबंधीत गोष्टींची ममता वाढते. त्यामुळे त्या गोष्टीत मन गुंतून पडते. त्या गोष्टी आपल्याजवळ असाव्यात असे वाटू लागते. ज्याच्यात जीव गुंतवलेला आहे ती गोष्ट मिळाली तरी दुःख नाही मिळाले तरी दुःख अशी अवस्था असते. म्हणून कशातही जीव न गुंतवण्यातच भले आहे. त्यामुळे मी ही गोष्ट मिळवली असा अहंकार होण्यापासून मनुष्य आपोआपच दूर राहतो. म्हणून उद्धवा, ही जी अहंता आणि ममता असते ती महादुःखाच्या भोवऱयात पाडते. हे लक्षात घेऊन निजदुःख निवारण्यासाठी भक्तिभावाने गुरुना शरण गेले पाहिजे. शरणागती पत्करलेल्या शिष्यावर गुरूची पूर्ण कृपा होते. ते मनातील हवेपणा उघड करून दाखवतात, त्या हवेपणाचा म्हणजे देहबुद्धीचा त्याग करावा. देहबुद्धीचा त्याग केला की, सर्व विश्व मीच व्यापले आहे हे लक्षात येते. लहान थोर जे जे दृष्टीला दिसते, ते ते सारे सृष्टीमध्ये माझेच स्वरूप आहे, माझ्या मीपणाची व्याप्ती एवढी मोठी आहे की, ती साऱया त्रैलोक्मयाला घोटीत सुटते. अशा शुद्ध मीपणाने आपण परिपूर्ण असता, मीतूपण सारेच आटोपते. याचंच नाव ‘निराभिमान’. हा सर्व मायेचा खेळ आहे. तेव्हा त्यात न गुंतलेलेच बरे. हे समजले की, मीपणाने ‘मी आणि माझे’, तसेच ‘तू आणि तुझे’ म्हणणेच उरत नाही. असे परब्रह्माशी ऐक्मय झाल्यामुळे सहजच ‘निर्मम’ होते. म्हणजे माझे असे काहीच नाही अशी खात्री पटते. उद्धवा! ‘निर्मम’ आणि ‘निराभिमान’ ते सारे हेच. संतांचे निजगुह्य आणि पाचवे व सहावे लक्षण ह्यालाच म्हणायचं. जे खरोखरच निर्मम व निरहंकार होऊन राहतात, त्यांना दुःखाचे डोंगर असले तरी ते अणुमात्र बाधत नाहीत. गतजन्मी केलेल्या पाप पुण्याच्या कृत्यानुसार या जन्मी सुख दुःख वाटय़ाला येतं, त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात. ह्या प्रारब्धाच्या घटना देहापुरत्याच मर्यादित असतात. म्हणजे गरीब, श्रीमंत, आजारी, निरोगी इत्यादि अवस्था ह्या देहाच्या वाटय़ाला येतात परंतु ज्याने देह म्हणजे मी नव्हे हे लक्षात घेतलेले आहे तो त्याच्या सद्गुरूंच्या शिकवणुकीनुसार देहाच्या अवस्थेकडे साक्षी भावाने पाहील व स्वतः ईश्वर स्मरणात निमग्न राहील. असे होत असताना काही कारणाने त्याच्या देहाला होत असलेल्या असह्य वेदना सहन करण्याची शक्ती त्याला ईश्वर देतो. काहीवेळा ईश्वर किंवा सद्गुरू त्या वेदना स्वतः सोसतात. गीतेत मी सांगितलेच आहे की, अनन्य-भावे चिंतूनी भजती भक्त जे मज । सदा मिसळले त्यांचा मी योग-क्षेम चालवी । 9.22 । हे लक्षात घे. भक्ताची सर्व जबाबदारी माझ्यावरच असते. म्हणून जो माझ्यावर विसंबून असतो त्याने देह प्रारब्धाच्या वाटय़ाला दिल्यानंतर सुखदुःखांच्या झळा लागल्या तरी, तो ब्रह्मसुखाच्या चव्हाठय़ावर देहाचा द्रष्टा-साक्षी होऊन राहतो. देहाला मोठी पदवी म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त झाली, तरी तो अंतःकरणामध्ये हर्ष मानीत नाही किंवा देह कोणी नरकामध्ये घोळसला तरी तो किंचितही खेद पावत नाही. देह हा वाघाच्या तोंडात सापडला, तरी तो त्या दुःखाने विव्हळत नाही अथवा देह पालखीपदस्थ झाला तरी त्याला आनंद होत नाही. सावली वि÷sवर पडली किंवा पालखीमध्ये चढली, तरी त्यामुळे त्या पुरुषाला सुख किंवा दुःख काहीच होत नाही, त्याप्रमाणेच देहभोग मुक्ताला वाटत असतात. त्याच्या दृष्टीपुढे दुःख दुःखपणाला मुकते आणि सुख सुखपणाला विसरते यामुळे तो द्वंद्व मुक्त होतो. तसेच जो निर्मम व निराभिमान असतो.
क्रमशः








