वृत्तसंस्था/ अॅडलेड
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य मिळविलेल्या भारताच्या विष्णू सर्वानन सलग दुसऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा भारताचा पहिला नौकानयनपटू ठरला आहे. येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली.
सेनादलात सुबेदारपदी असणाऱ्या सर्वाननने आयएलसीए-7 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 152 स्पर्धकांत 26 वे स्थान मिळवित पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली. आशियाई देशातील खेळाडूंत त्याने अव्वल स्थान मिळविताना आशियाई स्पर्धेतील सिंगापूरचा सुवर्णविजेता तसेच हाँगकाँग, थायलंडच्या नामवंत सेलर्सना मागे टाकत त्याने हे यश मिळविले. विष्णूने स्पर्धेअखेर 174 गुण मिळविले. स्पर्धेच्या नियमानुसार 49 हा त्याचा सर्वात कमी स्कोअर त्यातून वजा करण्यात आला, त्यामुळे त्याचा नेट स्कोटर 125 झाला. तो 2019 मध्ये झालेल्या यू-21 वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यविजेता सेलर आहे.









