विष्णूदेव साय होणार नवे मुख्यमंत्री : भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय
वृत्तसंस्था / रायपूर
विष्णूदेव साय हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजप विधिमंडळ पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या निवडीनंतर साय यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आता लवकरच शपथविधीचा मुहूर्त ठरणार आहे. आपल्या निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना साय यांनी राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील असेही स्पष्ट केले. तसेच ज्येष्ठ सहकारी रमणसिंह यांना विधानसभा अध्यक्षपद दिले जाणार असल्याचेही सांगितले. राज्यात जनस्नेही सरकार बनविताना निवासांसंबंधीच्या योजना आणि कृषीप्रधान संस्कृतीला चालना देण्यासाठी प्राधान्य देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
छत्तीसगडची कमान आदिवासी नेत्याकडे सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2003 ते 2018 या काळात तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या रमणसिंग यांची भाजपने निवड न केल्यास ओबीसी (इतर मागासवर्गीय) किंवा आदिवासी समाजातून मुख्यमंत्री निवड होईल, असा अंदाज आधीच वर्तवला जात होता आणि नेमके तेच घडले. राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबतची अनिश्चितता संपवत भाजपच्या 54 नवनिर्वाचित आमदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विष्णूदेव साय यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. राज्याचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी साय यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर प्रदेशाध्यक्ष अऊण साओ आणि ज्येष्ठ नेते ब्रिजमोहन अग्रवाल यांनी त्यांना पाठिंबा दिला.
मुख्यमंत्रीपद उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी रविवारी दुपारी रायपूर येथील पक्षाचे मुख्यालय असलेल्या कुशाभाऊ ठाकरे संकुलात विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि सर्बानंद सोनोवाल आणि पक्षाचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम हे तीन केंद्रीय निरीक्षकदेखील या बैठकीत उपस्थित होते. याशिवाय पक्षाचे छत्तीसगडचे प्रभारी ओम माथूर, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि राज्याचे सहप्रभारी नितीन नबीन हेही या बैठकीत उपस्थित होते.
आदिवासी समाजातून येणाऱ्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री विष्णूदेव साय, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या रेणुका सिंह, माजी राज्यमंत्री रामविचार नेताम आणि माजी राज्यमंत्री लता उसेंडी यांचाही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत समावेश होता. मात्र, आदिवसी समुदायातील ज्येष्ठ नेते विष्णू देव साय यांनी यात बाजी मारली. राज्याच्या लोकसंख्येमध्ये आदिवासी समाजाचा वाटा 32 टक्के असून अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव असलेल्या 29 जागांपैकी भाजपने यावेळी 17 जागा जिंकल्या आहेत. 2018 मध्ये आदिवासींसाठी राखीव असलेल्या केवळ तीन जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी त्यांनी आदिवासी बहुल सुरगुजा विभागातील सर्व 14 जागा जिंकल्या आहेत. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने 90 पैकी 54 जागा जिंकल्या आहेत. तर 2018 मध्ये 68 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या जागा 35 पर्यंत कमी झाल्या आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टी (जीजीपी) एक जागा जिंकण्यात यशस्वी झाली.
प्रदीर्घ राजकीय कारकीर्द
छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ आदिवासी नेते विष्णूदेव साय राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. ते सध्या कुंकुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. 1999 ते 2019 पर्यंत ते रायगडचे खासदार होते, तर एनडीएच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय पोलाद राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. 2014 ते 2016 या काळात ते केंद्रात मंत्री होते. ते दोनवेळा छत्तीसगडचे भाजप प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत.









