सुमारे 60 शिवभक्तावर गुन्हे दाखल; 21 शिवभक्तानां तीन दिवसाची पोलीस कोठडी
शाहूवाडी प्रतिनिधी
विशाळगड येथे अतिक्रमण हटाव मोहीम प्रकरणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रविवार 14 जुलै रोजी आंदोलन करण्यात आले होते .याप्रसंगी मोठ्या प्रमाणात घरांची तोडफोड करण्यात आली यावरून संबंधितांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .या शिवभक्तांच्यावर दाखल गुन्हे मागे घ्यावे .या मागणीसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात सुमारे चार तास ठाण मांडून बैठक मारली होती . कोणत्याही परिस्थितीत गुन्हे मागे घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी चांगलीच भूमिका घेतली आहे .
रविवार 14 जुलै रोजी माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली किल्ले विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती .गडावरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त गडावर दाखल झाले होते .या कालावधीत गजापूर ते विशाळगड या मार्गावर विशिष्ट समाजाच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून घरांचे नुकसान करण्यात आले होते . पोलीस बंदोबस्त असताना देखील मोठ्या संख्येने जमाव जमल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती . मोठ्या प्रमाणात घरांची मोडतोड गाड्यांची ही मोडतोड करुन घरांना आग लावणे तसेच धार्मिक स्थळावर हल्ला करणे अशा विविध बाबी घडल्या होत्या .किराणा दुकान व अन्य खाद्यपदार्थ देखील मोठ्या प्रमाणात विस्कटून रस्त्यावर पडले होते यामुळे परिस्थिती अतिशय तणावपूर्ण निर्माण झाली होती.
दरम्यान पोलीस स्टेशन मधून बाहेर आल्यानंतर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना माजी खासदार छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, मी वारंवार पोलीस अधिकाऱ्यांना विचारत होतो की माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे का नाही . तर याबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणतेच उत्तर मिळत नव्हते . माझ्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर सांगा आत्ताच मी या ठिकाणी आलेलो आहे . मात्र याबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणतेही उत्तर येत नसल्याची माहिती यावेळी संभाजी राजे यांनी दिली.
रविवार 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे ,जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित ,अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या सह अनेक वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते मात्र तरीही आक्रमक जमावाकडून मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली होती .
60 शिवभक्तावर गुन्हे दाखल
दरम्यान या मोडतोड प्रकरणी अज्ञात 60 शिवभक्तांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली . तर या पैकी 21 शिव भक्ताना शाहूवाडी मलकापूरचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली .
छत्रपती संभाजी राजे शाहूवाडी पोलीस ठाण्यात
शिवभक्तांच्या वर गुन्हे दाखल केले आहे ते तात्काळ मागे घ्यावेत . या मागणीसाठी छत्रपती संभाजी राजे हे स्वतः शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले होते . सुमारे चार तास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची त्यांच्याशी चर्चा सुरू होती . दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवर छत्रपती संभाजीराजे ठाम आहेत .