कोल्हापूर, पन्हाळा- प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि इतिहासात गौरवशाली स्थान असलेल्या किल्ले विशाळगडच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार विनय कोरे यांनी दिली. विशाळगड संवर्धन संदर्भात किल्ले पन्हाळगडावर झालेल्या शिवभक्तांच्या बैठकीत ते बोलत होते.
किल्ले विशाळगडवरील अतिक्रमण, ऐतिहासिक स्थळांची झालेली दुरावस्था गडावरील अस्वच्छता आणि गडाची संवर्धन या विषयावर तोडगा काढण्यासाठी विशाळगड संवर्धनासाठी काम करणाऱया विविध संघटना आणि संस्थांच्या प्रमुख प्रतिनिधींबरोबर आमदार विनय कोरे यांची बैठक पार पडली. किल्ले पन्हाळा गडावर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, हर्षल सुर्वे, बंडा साळुंखे, दिलीप देसाई, किशोर घाटगे, राम यादव, अमित अडसूळ, बाळासाहेब भोपळे, मधुकर नाझरे, अँड राजेंद्र पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी व शिवभक्त उपस्थित होते.
पन्हाळय़ाचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या बैठकीत किल्ले विशाळगड संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी किल्ले विचार करता इतिहास आणि त्याचे महत्त्व सांगून गडावरील दुर्लक्षित असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांना पुन्हा उजेड जाण्याची गरज असल्याचे सांगितले. हर्षल सुर्वे यांनी गडावर छत्रपती शिवरायांचे भव्य शिल्प उभारणीस मागणी केली. तसेच विशाळगडावरील पुरातन फरसबंदी मार्ग मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणावर तत्काळ कारवाई करण्याची गरज असल्याचेही सांगितले. बैठकीतील उपस्थित प्रमुखांकडून माहिती घेतल्यानंतर आमदार विनय कोरे यांनी गडाचे गडपण जपताना गडावरील कोणत्याही ऐतिहासिक स्थळांना धक्का न लावता त्याची संवर्धन करण्याची गरज असल्याचे सांगितले. गडाचे संवर्धन करताना कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. शिवभक्तांकडून येणाऱया सूचना डोळय़ासमोर ठेवूनच विशाळगडचा विकास केला जाईल आणि भविष्यात गड अतिक्रमणमुक्त व प्रदूषण मुक्त कसा राहील यासाठी काम करू अशी ग्वाही आमदार कोरे यांनी दिली.









