चेनस्नॅचिंग, चोरी प्रकरणांमध्ये सहभागाचा संशय : सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
बेळगाव ; रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी बेळगाव पोलिसांनी अटक केलेल्या संशयित गुन्हेगाराने गोव्यात चोरी व चेनस्नॅचिंग केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. गोवा पोलिसांनाही यासंबंधीची माहिती मिळाली असून एक-दोन दिवसांत गोवा पोलीस बेळगावला येण्याची शक्यता आहे. 9 सप्टेंबर रोजी विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी विशालसिंग चव्हाण (वय 25) रा. शास्त्राrनगर याला अटक केली आहे. 1 जून 2023 रोजी भूखंड दाखविण्याचे सांगून एका रिअल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले होते. तसेच खंडणीची मागणी करण्यात आली होती. टिळकवाडी पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआरही दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी या प्रकरणाचा तपास सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार, कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांचा समावेश असलेल्या विशेष पथकाकडे सोपविला होता. या पथकाने विशालसिंगला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने गोव्यात चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे.
विशालसिंगवर बेळगाव शहर-उपनगरात दहा गुन्हे नोंद
विशालसिंगवर बेळगाव शहर व उपनगरात दहा गुन्हे नोंद आहेत. खून, खुनी हल्ला, अपहरण आदी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर न्यायालयीन कामकाजासाठीही तो हजर नव्हता. बेळगावात गुंडगिरी करणाऱ्या विशालसिंग व त्याच्या साथीदारांनी गोव्यात चोऱ्या, चेनस्नॅचिंग केल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे.
लवकरच गोवा पोलीस बेळगावला येणार…
बेळगाव पोलिसांना गोव्यातील काही सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले आहेत. बेळगावचा विल्लक व विशालसिंग हे दोघे मोटारसायकलवरून चोरीसाठी गोव्यात फिरतानाचे हे फुटेज असून गोव्यातील म्हापसा, डिचोली, साखळी, हणजुण, कोलवाळसह वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चेनस्नॅचिंग प्रकरणात या जोडगोळीचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. गोवा पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून खात्री करून घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच गोवा पोलीस बेळगावला येणार असल्याची माहिती मिळाली आहे.









