सांगली प्रतिनिधी
निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये सूचना दिल्या असताना सुद्धा जाणून बुजून दुसऱ्या क्रमांकाचे ईव्हीएम मशीन डाव्या बाजूला पहिल्या क्रमांकाला ठेवल्याचे प्रकार काही ठिकाणी झाले असून विरोधकांकडून शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे असा आरोप सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केला आहे.
मिरज तालुक्यातील पदमाळ येथे सपत्नीक मताधिकार बजावल्यानंतर विशाल पाटील यांनी विविध मतदान केंद्रावर भेटी देण्यास सुरुवात केली असून या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ईव्हीएम मशीन चुकीच्या जागी ठेवण्याबरोबरच मतदान केंद्राबाहेर लावलेल्या उमेदवारांच्या माहितीतून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप केला आहे. याबाबत आपण जिथे भेट दिली तेथील मतदान केंद्रावर बदल करण्यास लावले असल्याचेही विशाल पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.








