यापुढे भाजपचे चिन्ह वापरल्यास कारवाईचा इशारा
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना पक्षाचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवणारे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना भाजप पक्षातून निलंबित करण्यात आले आहे . त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून त्यांना प्रदेश व मोर्चाच्या उपाध्यक्ष पदावरून काढण्यात आले आहे . भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपल्या पत्रान्वये असे स्पष्ट केले आहे. श्री परब यांनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असे पक्षाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले होते . मात्र , त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे त्यांनी यापुढे पक्षाचे चिन्ह अथवा पक्षाचा वापर करू नये अथवा फोटो वापरू नये तसे केल्यास कारवाई करण्यात येईल असे पत्रात म्हटले आहे.









