उर्वरित 64 पैकी 45 जणांनी न्यायालयीन स्थगिती आणली आहे.
शाहूवाडी : गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याच्या दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार किल्ले विशाळगड येथील उच्च न्यायालय मुंबई येथे स्थगिती नसलेली 14 अतिक्रमणे शनिवारी काढण्यात आली. अतिक्रमणधारकांना 30 मे रोजी पूर्वसूचना देण्यात आली होती.
यानुसार कडेकोट पोलीस बंदोबस्तासह पुरातत्व विभाग, महसूल, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. प्रशासकीय यंत्रणेच्या मोठ्या बंदोबस्तात सकाळी सात वाजता विशाळगडावर अतिक्रमण काढण्यास प्रशासकीय यंत्रणा गेली होती.
पुरातत्व विभागाचे संचालक विलास वाहणे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, प्रभारी तहसीलदार गणेश लव्हे, वनसंरक्षक कमलेश पाटील, पेंडाखळे वनपरिक्षेत्र अधिकारी सुषमा जाधव, डीवायएसपी आप्पासो पवार, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम पार पडली.
या मोहिमेत सत्तार काशीम मालदार, हाफीज युसूफ शेख, आफरीन रियाज हवालदार, राजेंद्र नारायण कदम, बावाखान अहमद मुजावर, मौलाना खोली, इम्रान अब्दुल गणी मुजावर, शकील मीरासाहेब मुजावर, सुलतान दाऊद म्हालदार, यासीन मुबारक मलंग, शबाना नासीर शहा व अन्य तीन अशी 14 अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
या कारवाईनंतर प्रांताधिकारी समीर शिंगटे म्हणाले, गडावर एकूण 158 अतिक्रमणे होती. पैकी 94 अतिक्रमणे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात काढली. उर्वरित 64 पैकी 45 जणांनी न्यायालयीन स्थगिती आणली आहे. पाच जणांनी स्वत: अतिक्रमणे काढून घेतली. राहिलेली 14 अतिक्रमणे शनिवारी सात तासांची मोहीम राबवून काढण्यात आली.
अतिक्रमणातील साहित्य तत्काळ मुंडा दरवाजा येथे कामगारांच्या मदतीने जमवून तेथून गडाखाली क्रेनच्या सहाय्याने आणण्यात आले. यासाठी सुमारे 150 कामगार नेमले होते. केंबुर्णेवाडीपासून दर्ग्यापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या अतिक्रमण मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, अभिजीत पाटील यांच्यासह 100 पोलीस कर्मचारी, वनविभागाचे 40 कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 80 कर्मचारी, महसूल विभागाचे 25 अशी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
नूतन पोलीस अधीक्षकांनी आठ दिवसांपूर्वी दिली होती भेट
कोल्हापूर जिह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी आठ दिवसांपूर्वी विशाळगडला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी विशेष खबरदारी घेत अधिकारी वर्गाला आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.








