मेक्सिकोतील फिडे जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सहभागाची संधी पाच खेळाडूंना हुकली
वृत्तसंस्था/ चेन्नई
फिडे जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेच्या आधी भारताला अनेक धक्के बसले असून त्याअंतर्गत पाच खेळाडूंना व्हिसा समस्यांमुळे स्पर्धेला मुकावे लागणार आहे. ही स्पर्धा 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान मेक्सिको सिटीमध्ये होणार आहे. नियोजनानुसार रवाना होण्याच्या काही दिवस आधी दोन प्रशिक्षकांसह भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या पाच खेळाडूंना वेळेवर व्हिसा मिळालेला नाही. परिणामी त्यांच्या सहभागाविषयी अनिश्चितता निर्माण झाली. दरम्यान, सूत्रांनी सदर पाच खेळाडूंना स्पर्धेस मुकावे लागणार याची पुष्टी केली असून त्यामुळे भारतीय तुकडीचा आकार कमी झाला आहे.
वृषांक चौहान, अऊण कटारिया, भाग्यश्री पाटील, प्रणित वुप्पाला आणि फेमिल चेल्लादुराई या खेळाडूंसह प्रशिक्षक प्रविंद ठिपसे एम. आणि किरण अग्रवाल यांना याचा फटका बसला आहे. फिडे सल्लागार मंडळाचे अध्यक्ष भरतसिंह चौहान यांनी यासंदर्भात बोलताना, भारत सरकारकडून सर्वोत्तम प्रयत्न करण्यात येऊनही व्हिसाची व्यवस्था करता आली नाही, असे सांगितले आहे.
‘भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्का असून संबंधित खेळाडूंसाठी ही चांगली बातमी नाही. ते एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अनुभवाला यामुळे मुकणार आहेत. इतकेच नव्हे, तर ते पदकांचे दावेदार देखील होते. माझ्या 45 वर्षांच्या बुद्धिबळातील कारकीर्दीत मी असे कधीच घडताना पाहिलेले नाही. सर्व आवश्यक कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करूनही आम्ही व्हिसा मंजूर करून घेऊ शकलो नाही आणि असे का घडले याची मला अद्याप कल्पना नाही, असे चौहान यांनी सांगितले.
तथापि, त्यांनी सदर दोन प्रशिक्षकांची जागा सीआरजी कृष्णा (पुऊष) आणि तारिणी गोयल (महिला) यांनी घेतली आहे याला पुष्टी दिली. ते त्यांच्या अमेरिकी व्हिसाच्या आधारे मेक्सिकोच्या राजधानीकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी, रविवारी चौहान यांनी व्हिसाचा प्रश्न हा प्रामुख्याने मेक्सिकन दूतावासामुळे निर्माण झाल्याचे म्हटले होते. भारतात असलेल्या नेपाळच्या काही खेळाडूंनाही अशीच समस्या भेडसावलेली असून त्यांना देखील स्पर्धेला मुकावे लागले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारतीय तुकडी मंगळवारी सकाळी मेक्सिको सिटीला रवाना झाली. ज्या खेळाडूंना स्पर्धेस मुकावे लागले आहे त्यांच्याविषयी विचारले असता चौहान म्हणाले की, आता राष्ट्रीय स्पर्धा होणार असून त्यांना त्यात सहभागी होण्याविषयी विचारण्यात आले आहे. ज्यांना स्वारस्य आहे त्यांना भाग घेण्याची परवानगी दिली जाईल.









