विदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेचा मोठा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेने भारतीय आणि अन्य विदेशी विद्यार्थ्यांना कठोर इशारा दिला आहे. स्वत:चे शिक्षण सोडल्यास किंवा सूचना न देता स्वत:च्या स्टडी प्रोग्राममधून हटल्यास स्टुडंट व्हिसा रद्द केला जाऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेत अवैध स्थलांतरितांच्या विरोधात सुरू असलेली कठोर कारवाई आणि सामूहिक निर्वासनाच्या चिंतेदरम्यान हा इशारा देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम सोडल्यास किंवा वर्गात उपस्थित न राहिल्यास किंवा विद्यापीठाला न कळविता शिक्षण सोडल्यास स्टुडंट व्हिसा रद्द होऊ शकतो. यामुळे भविष्यात अमेरिकेचा व्हिसा प्राप्त करता येणार नाही. विद्यार्थ्यांनी नेहमी स्वत:च्या व्हिसाच्या अटींचे पालन करावे असे भारतातील अमेरिकेच्या दूतावासाने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेत विदेशी विद्यार्थ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात असताना हा इशारा देण्यात आला आहे. अनेक विद्यार्थ्यांचा व्हिसा अचानक आणि पूर्वकल्पना न देता रद्द करण्यात येत आहे. यातील काही प्रकरणांमध्ये पॅलेस्टाइन समर्थक निदर्शनांमध्ये भाग घेणे, वाहतूक उल्लंघन किंवा व्हिसा अटींचे उल्लंघन अशी कारणे समोर आली आहेत. ट्रम्प प्रशासनाने विदेशी विद्यार्थ्यांच्या विरोधात अत्यंत कठोर धोरणं अवलंबिली आहेत.
याचदरम्यान ट्रम्प प्रशासन ‘ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग’ कार्यक्रम समाप्त करण्याची योजना आखत आहे. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत स्वत:चे शिक्षण पूर्ण केल्यावर काम करण्याची अनुमती देतो. अमेरिकेच्या खासदारांनी यापूर्वीच ऑप्शनल प्रॅक्टिकल प्रोग्राम समाप्त करण्याची तरतूद असलेले विधेयक मांडले आहे.









