अध्याय नववा
मागील अध्यायात वरेण्यराजाने बाप्पांना विश्वरूप दाखवण्याची विनंती केली. तो बाप्पांचा अनन्य भक्त होता. त्यामुळे तपस्वी, ज्ञानी, योगी ह्यांना दिसणे सहज शक्य नसते. ते विश्वरूप भक्तावरील प्रेमापोटी राजाला दाखवायला बाप्पा सहजी तयार झाले. बाप्पांचे विश्वरूप सामान्य डोळ्यांनी बघता येण्यासारखे नसल्याने त्यांनी राजाला दिव्यचक्षु प्रदान केले. दिव्य म्हणजे दैवी. जसजसे वरेण्य बाप्पांचे विश्वरूप बघू लागला तसतशी त्यातली रौद्रता त्याला जाणवू लागली आणि एकूणच त्या विश्वरूपाचे भीषण स्वरूप बघितल्यावर त्याला भयाने कापरे सुटले. त्याने ताबडतोब बाप्पांना विनंती केली की, तुम्ही माझ्यावर कृपा करून तुमचे नेहमीचे सौम्य रूप धरण करा. बाप्पांनी त्यांची तीही विनंती ऐकली आणि नेहमीचे आपल्या सर्वांनाच प्रिय असलेले सगुण रूप धारण केले. एकूणच विश्वरूपाची कल्पना करणे किंवा दिव्य चक्षुने ते पाहणे हे अनन्य भक्ताच्या वकुबाच्याही बाहेरचे आहे. मग सामान्य भक्ताची तर गोष्टच करायला नको. त्यामुळे उपासना करण्यासाठी विश्वरूप कामाचे नाही हे लक्षात येते. विश्वरूप सोडून ईश्वराची सगुण आणि निर्गुण अशी दोन रूपे असतात. सगुण रूपातील देव भक्तांच्या नजरेसमोर तरळत असल्याने त्याला तो आपलासा वाटतो. त्याउलट निर्गुण रुपाला कोणताही आकार असा नसतो. त्यामुळे निर्गुण रूपाची उपासना करणे सगुण रुपाची उपासना करण्यापेक्षा अवघड असते. म्हणून श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात की, निर्गुण काय आहे ते समजून घ्यावे पण उपासना सगुणाची करावी.
जी रूपे परमेश्वर भक्तांच्या उद्धारासाठी वेळोवेळी धारण करतात त्या रूपांना निर्गुण निराकार ईश्वराची सगुण रूपे असं म्हणतात. त्यांची उपासना करणे म्हणजे सगुण उपासना करणे होय. जे अव्यक्त असलेल्या परमेश्वराची उपासना करतात तिला निर्गुण किंवा निराकार उपासना असे म्हणतात. अव्यक्त असलेला परमेश्वर सर्वज्ञ, सर्व शक्तीमान, सर्वव्यापी असून अखिल ब्रह्मांड व्यापून आहे आणि समोर जे जे दिसतंय ते ते सर्व त्याचीच रूपे आहेत असे मानून जे उपासना करतात ती निर्गुण उपासना होते. थोडक्यात सगुण उपासनेमध्ये भक्ताच्या समोर सगुण रूपातली त्याच्यासारखीच दिसणारी भगवंताची मूर्ती असते तर निर्गुण उपासनेमध्ये त्याच्या समोर कोणतीही ठराविक अशी मूर्ती नसते. अशावेळी आपण कोणती उपासना करावी म्हणजे बाप्पांना ती आवडेल असा प्रश्न भक्ताच्या मनात उभा राहतो कारण बाप्पांना ज्या प्रकारची उपासना आवडते त्या प्रकारची उपासना आपण करावी अशी भक्ताची इच्छा असते. भक्ताच्या मनातील हा प्रश्न जाणून त्यांना कोणता भक्त प्रिय आहे ते त्यांच्याकडूनच समजून घ्यावे असे वरेण्याने ठरवले, म्हणून त्याने बाप्पांना प्रश्न केला की,
अनन्यभावस्त्वां सम्यङ्मूर्तिमन्तमुपासते ।
योऽक्षरं परमव्यत्तं तयोऽ कस्ते मतोऽधिकऽ ।। 1 ।।
अर्थ- वरेण्य महाराजांनी बाप्पांना विचारले, जो अनन्यभक्त मूर्तीरूपाने तुझी उत्तम प्रकारे उपासना करतो आणि जो श्रेष्ठ अशा अविनाशी अव्यक्ताची म्हणजे निर्गुण ब्रह्माची उपासना करतो त्या दोघांपैकी तुला अधिक प्रिय कोण आहे?
विवरण-वरेण्यराजा बाप्पांना विचारतोय की, तुम्हाला सगुण उपासना करणारा भक्त प्रिय आहे की, निर्गुण उपासना करणारा? असं विचारण्याचं कारण म्हणजे समोर आपल्यासारखीच ईश्वराची मूर्ती दिसत असली की, मनुष्य त्यात जास्त रमतो, कारण माणसाला प्रेम करायला त्याच्यासारखाच देहधारी समोर असावा लागतो. मग त्याची चरित्रे, त्याच्या लीला, त्याचं गुणवर्णन, त्याचं साधू रक्षणाचं कार्य यांच्या आठवणीत तो रंगून जातो. ही सगुणोपासना होय.
क्रमश:








