दसरा झाला. दिवाळी आली. खरेदीची वेळ झाली. चला तर मग ऑनलाईन खरेदी करू या’. हा विचार करुन आता बहुतांश लोक ऑनलाईन खरेदीला लागतील. तसेही आपल्या प्रत्येकाकडे असलेला स्मार्ट फोन, त्यातील व्हॉटसअॅप ग्रुप, आवडत्या कंपन्यांकडून खरेदी करण्यासाठी वेळोवेळी केलेले गुगल सर्च यामुळे थेट ग्राहकांना वारंवार ऑनलाइन कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या सवलती याचे न चुकता मेसेज येत राहतात. त्यामुळे आता ऑनलाइन खरेदीची मानसिकता वाढू लागली आहे. ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन बड्या कंपन्या ऑनलाइन विक्रीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्याचमुळे की काय आज ‘ऑनलाइन शॉपिंग एक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे’. कोणत्याही वस्तूची शॉपिंग करायची म्हटल्यावर सर्रास आजकाल प्रत्येकजण ऑनलाइन किंमत किती आहे, व्हरायटी किती आहेत, दुकानातील किंमत व ऑनलाईन किंमत ह्या बाबी तपासतो आणि सरतेशेवटी ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय स्वीकारतो.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत प्रा. सतीश आठवले यांनी ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संदर्भातील संशोधन नुकतेच पूर्ण केले. या संशोधनात त्यांनी ग्राहकांचा कल, त्यांच्या आवडीनिवडी, ऑनलाइन खरेदीवर होणारा खर्च या अनुषंगाने अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी विविध स्तरांतील ग्राहकांशी संवाद साधला. सुमारे 500 ते 2 हजारांच्या उत्पन्न गटातील तरुण त्यांचे 70 टक्के उत्पन्न ऑनलाइन खरेदीवर खर्च करतात. तर 11.7 टक्के महिला, 9.5 टक्के उद्योजक आणि 9.8 टक्के खासगी क्षेत्रातील नोकरदार ऑनलाइन खरेदी करतात, हे त्यांच्या अभ्यासात समोर आले आहे.
ऑनलाइन शॉपिंगचे फायदे/तोटे- या ऑनलाइन शॉपिंगचे फायदे खूप आहेत. त्यामध्ये वेळेची होणारी बचत. म्हणजे जर एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेलात तर दिवसातील काही वेळ हा मार्केटमध्ये नुसता फिरण्यामध्ये जातो. तसे म्हटले तर तो वाया जाणारा वेळ आहे. (फिरण्याचा आनंद मिळतो तो वेगळा) मात्र ऑनलाइन शॉपिंगमुळे हा वेळ वाचवता येतो. बाहेर जाऊन वस्तू घेऊन येणे, पेक्षा ऑनलाईनमुळे हीच सेवा घरपोच मिळू शकते. वस्तू खरेदी केल्यावर त्याची डिलिव्हरी घरपोच मिळते व त्यासाठी जाणारा वेळ व बाजारात जाण्यायेण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत होते. जर बाजारात एखादी वस्तू नाही मिळाली तर ती शोधावी लागते. त्यामध्ये एनर्जी वाया जाते. ऑनलाइन शॉपिंगमुळे ही एनर्जी वाचवता येते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वस्तूची किंमत. जर एखादी वस्तू महाग वाटली तर इतर ठिकाणी (वेबसाईट्स) त्याची किंमत तपासून मग खरेदी करता येते. आपल्याला लागणारी वस्तू ही 24/7 मध्ये उपलब्ध असल्याने व ती 24/7 वेळेमध्ये (काही अपवाद वगळता) खरेदी करता येते. ही खरेदी अतिशय सोप्या पध्दतीने म्हणजे क्रेडीट किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बॅंकिंगद्वारे करू शकतो. तसेच वस्तू हातात मिळाल्यानंतर पैसे देऊ शकतो ज्याला कॅश ऑन डिलिव्हरी असे म्हणतात.
या शॉपिंगला वेळेचे कोणतेही बंधन नाही. काही साइट्सचा अपवाद वगळता 24/7 ऑनलाइन शॉपिंग करता येते. रांगेत उभे राहण्याचा त्रास नाही. मार्केटमध्ये काही वस्तूंची शॉपिंग करण्यासाठी रांगेत उभारावे लागते. मात्र हा त्रास ऑनलाइन शॉपिंग करताना टाळता येतो. आपल्याला वस्तू खरेदीच्या वेगवेगळ्या ऑफर्स सणासुदीच्या काळात अनेक साइट्सच्या माध्यमातून मिळतात ज्याचा फायदा ग्राहकांना होतो.
जसे ऑनलाइन शॉपिंगचे फायदे आहेत तसे तोटेपण आहेत. ज्या कंपनीची वस्तू आपण खरेदी करणार आहात, त्या कंपनीची ऑनलाइन खरेदी संदर्भातील माहिती तपासून घ्यावी, त्यामुळे होणारी संभाव्य फसवणूक टाळली जाऊ शकते.
ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्राम यावर आज बऱ्याच जाहिराती येत असतात. विषेश करुन कपडे खरेदीसाठी असलेले डिस्काऊंट. यावरुन खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता निश्चितच आहे. यांचे कोणतेही ऑफिशियल पोर्टल नाही. एका वेबसाईटवर आपला फोन, इमेल द्यायचा, कॅश-ऑन-डिलिव्हरीद्वारे खरेदी करायची. हे होत असताना अॅमेझोन लॉजिस्टीक (कुरिअर)चा वापर करायचा. पार्सल आले की पैसे द्यायचे. पार्सल फोडून पाहिले तर लक्षात येते की फाटके, मळलेले, साईझप्रमाणे नसलेले किंवा कपड्याच्या चिंध्या हाती लागतात. पैसे तर दिलेले असतात. अशा फसवणूकीचे सध्या पेव फुटले आहे.
ऑनलाइन शॉपिंगची कंपनीची किंवा वेबसाइटची सत्यता तपासून पाहावी. त्याचप्रमाणे खरेदी झाल्यानंतर आर्थिक तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या बँकेची खरी वेबसाइट लिंक दिलेली असेल तरंच त्याचे तपशील भरावेत. शक्यतो ‘कॅश ऑन डिलिव्हरी‘चा पर्यायच निवडावा. त्यामुळे खरेदी करताना काही चूक झाल्यास आपण दिलेल्या रक्कमेचा घोळ होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही वेळेस वस्तू चुकीची येऊ शकते. त्यासाठी मागविण्यात आलेले पार्सल उघडताना त्याचा व्हिडिओ करा. पार्सल उघडताना त्यात असलेल्या वस्तू डॅमेज असतील, तर ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होईल. आपली खरेदी झाल्यानंतर आलेले ई-बिल तपासून घ्यावे ते जतन करावे. इतर कोणत्याही मध्यस्थ ऑनलाइन वेबसाइटवरून खरेदीचे आर्थिक व्यवहार करू नयेत. पूर्ण माहिती आणि खात्री झाल्याशिवाय ती वस्तू खरेदी करू नये. तसेच खरेदी केलेली वस्तू किंवा पैसे परत घेतले जात असतील किंवा वस्तू बदलून मिळत असतील तरंच ऑनलाइन खरेदी करा. आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा ‘पिन’, सीसीव्ही नंबर आणि कार्डच्या मागील सिक्युरिटी नंबर, ग्रीड नंबर कोणालाही खरेदी करतेवेळी देऊ नका, तुम्ही ती स्वत: भरा.
ऑनलाइन खरेदी करताना या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे, तरंच तुमची संभाव्य फसवणूक टाळली जाऊ शकते.
स्थानिक बाजारपेठवरील परिणाम- आज छोट्या शहरामध्येसुध्दा ग्राहक ऑनलाईन शॉपिंगकडे वळला आहे. ह्यामुळे प्रत्यक्ष खरेदीला कमी प्रतिसाद मिळणार असल्याने दुकानदारांनीही माल आटोक्यातच ठेवला आहे. बाजारपेठेमध्ये सणासुदीव्यतिरिक्त बऱ्यापैकी ग्राहक कमी दिसून येत आहेत. एकूण उलाढाल ऑनलाईन शॉपिंगमुळे कमी झाल्याचे दुकानदार खाजगीत सांगत आहेत. मात्र असे असलेतरी दुकानदार आता विविध प्रकारे सोशल मीडियाचा व इंटरनेटचा वापर मार्केटिंग़साठी करत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करताना दिसून येत आहेत. साधारण पाहिले तर खालील बाबींवर या ऑनलाईन शॉपिंगचा परिणाम दिसून आला आहे. ऑनलाईन शॉपिंगमुळे बाजार भावविश्वाचे एक प्रकारचे युद्ध सुरु झाले आहे. आणि या किंमत युद्धाचे मुख्य पीडित आहेत ते रिटेलर्स. यातील बहुतेक रिटेलर्सनी त्यांचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु रोजच्या कामकाजाचा होणारा खर्च लक्षात घेता या रिटेलर्सना टिकून रहावे म्हणून त्यांनी काही प्रमाणात आपल्या नफ्यावर पाणी सोडले आहे. ऑनलाईनवर प्रचंड मिळत असलेल्या सवलती ह्या ग्राहकांसाठी नक्कीच फायद्याच्या आहेत, मात्र हे रिटेलर्स इतक्या सवलती देऊ शकत नाहीत. ह्या लोकांबरोबर स्पर्धा करणे शक्य नसल्याने तरीपण टिकून राहण्यासाठी त्यांनी किमती काही प्रमाणात कमी केल्या आहेत. ऑनलाइन स्टोअर्समध्ये वस्तूंचा साठा प्रचंड प्रमाणात असल्याने ग्राहक तिथे आकृष्ट होताना दिसतात. रिटेलर्स इतक्याप्रमाणात हा विविध प्रकारचा साठा ठेवू शकत नाहीत. ज्यामुळे ग्राहकाचे समाधान करणे ह्या लोकांना शक्य होत नाही. जेणेकरून ह्या रिटेलर्सचा व्यवसाय कमी होऊ लागला आहे.
भविष्यात ही व्हर्च्युअल बाजारपेठ कशी वळण घेणार आहे हे काळच ठरवेल. मात्र ग्राहक म्हणून आपली सद्सदविवेक बुद्धी शाबूत ठेवून खरेदी करावी लागणार हे नक्की.
-विनायक राजाध्यक्ष








