मुंबई / वृत्तसंस्था
जागतिक क्रिकेटमधील दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली व केन विल्यम्सन आज (रविवार दि. 8) आरसीबी-सनरायजर्स हैदराबाद आयपीएल साखळी सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. विराट कोहली व विल्यम्सन यंदाच्या हंगामात बरेच झगडत आले असून येथे त्यांना सूर सापडणार का, याची उत्सुकता असेल. ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाणार आहे.
विराटला आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यात 21.60 च्या सरासरीने केवळ 216 धावा जमवता आल्या असून याचवेळी सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन 10 सामन्यात 22.11 च्या सरासरीने 199 धावा जमवू शकला आहे. हे दोन्ही दिग्गज फलंदाज जागतिक क्रिकेटमधील आपल्या लौकिकाला अनुरुप खेळू शकलेले नाहीत आणि यामुळे त्यांच्या संघाची मोठी निराशा झाली आहे.
विराटने गुजरात टायटन्सविरुद्ध अर्धशतक झळकावत आपण बहरात परतत असल्याची प्रचिती दिली. पण, चेन्नईविरुद्ध मागील लढतीत तो पुन्हा अपयशी ठरला. प्रारंभी, 3 चौकार व 1 षटकार फटकावत आश्वासक सुरुवात केली असली तरी नंतर तो फटकेबाजी करु शकला नाही. याऐवजी त्याने एकेरी धावा घेण्यावर भर दिला. याचा पर्यवसान संघसहकारी ग्लेन मॅक्सवेल धावचीत होण्यात झाले. स्वतः मॅक्सवेलने विराटच्या वेगाने धावणे कठीण असल्याचे नंतर मान्य केले होते. कोहली त्या लढतीत 33 चेंडूत 30 धावांवर बाद झाला.
त्या तुलनेत विल्यम्सन अधिक सातत्यपूर्ण खेळत आला असून टायमिंग व प्लेसमेंटवर त्याचा भर राहिला आहे. मात्र, उत्तम प्रारंभ करुनही याचे तो मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकलेला नाही. विल्यम्सनचा स्ट्राईक रेट 96.13 असा किरकोळ राहिला आहे.
सनरायजर्स हैदराबाद सलग 5 विजयानंतर आता सलग 3 पराभव पत्करावे लागले असून यात आघाडीचे गोलंदाज दुखापतग्रस्त झाले, याचा त्यांना प्रामुख्याने फटका बसला आहे. शनिवारच्या लढतीपूर्वी गुणतालिकेत ते सहाव्या स्थानी होते. सनरायजर्स हैदराबादचा मुख्य फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला हाताची दुखापत झाली असून डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट टी. नटराजनला चेन्नईविरुद्ध वेदना जाणवल्या. हे दोघेही दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळू शकले नाहीत आणि प्रतिस्पर्धी संघाने याचा लाभ घेत 200 धावांचा टप्पा सहज सर केला. हे दोघे खेळाडू आजच्या लढतीत परतणार का, हे स्पष्ट होणे बाकी आहे.
संभाव्य संघ
आरसीबी ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनूज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मॅरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलीप्स, आर. समर्थ, शशांक सिंग, रोमारिओ शेफर्ड, मार्को जान्सन, जे. सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन ऍबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फझलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.









