वैयक्तिक कारणास्तव घेतली माघार : बदली खेळाडूची लवकरच घोषणा, बीसीसीआयची माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणांमुळे विराटने हा निर्णय घेतल्याची माहिती बीसीसीआयने दिली. याशिवाय बदली खेळाडूची घोषणा लवकरच केली जाईल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाने तयारीसुद्धा सुरू केली आहे. पण आता अनुभवी फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने विराट कोहली बाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे, यामध्ये विराटच्या न खेळण्यामागचे कारण सांगण्यात आले आहे. वैयक्तिक कारणांचा हवाला देत विराटने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून ब्रेक देण्याची विनंती केली आहे. त्याने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी बोलून हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने त्याच्या निर्णयाचा आदर केला असून बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने स्टार फलंदाजाला पाठिंबा दिला आहे.
बीसीसीआयने मीडिया आणि चाहत्यांना विनंती केली आहे की, त्यांनी विराटच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि त्याच्या वैयक्तिक कारणांवरून अंदाज लावणे टाळावे. निवड समिती लवकरच त्याच्या बदलीच्या नावाची घोषणा करणार आहे. आता विराटच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान.









