भारतीय कर्णधार रोहित शर्माचे स्पष्ट प्रतिपादन, संघव्यवस्थापन विराटच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार,
लंडन / वृत्तसंस्था
भारतीय कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा खराब फॉर्ममधील विराट कोहलीला पाठबळ दर्शवले असून विराटला यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही आधाराची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले आहे. इंग्लंडविरुद्ध दुसऱया वनडे सामन्यात विराट 16 धावांवर बाद झाला आणि त्याची अपयशाची मालिका कायम राहिली. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना तो बोलत होता.

प्रसारमाध्यमांशी वार्तालापात एक प्रश्न मध्येच थांबवत रोहितने आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आपल्याला विराटच्या खराब फॉर्मची इतकी चर्चा करण्याची गरज का आहे, हेच मला उमजत नाही’, असे रोहित उद्विग्नपणे म्हणाला. ‘विराटने खूप सामने खेळले आहेत. तो महान खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे, त्याला कोणत्याही आधाराची आवश्यकता नाही’, असे तो म्हणाला.
विराटला बटलरचेही समर्थन
रोहितने पाठबळ दर्शवल्यानंतर इंग्लिश प्रतिस्पर्धी कर्णधार जोस बटलरने देखील आपल्याला विराटचे फलंदाजीतील गतवैभव पहायचे आहे, असे आवर्जून नमूद केले.
‘विराट मशिन नव्हे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. काही डावात धावा झाल्या नाहीत म्हणून त्याच्यावर टीका करण्याचे काहीही कारण नाही. तो केवळ वनडे क्रिकेटमधील नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे’, असे बटलर याप्रसंगी म्हणाला.
विराटला या मालिकेतील सलामी लढतीत धोंडशिरेच्या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. त्यानंतर दुसऱया वनडेसाठी तो संघात परतला. पण, अवघ्या 16 धावांवर त्याला बाद होत परतावे लागले. वास्तविक, तीन लक्षवेधी चौकार फटकावत विराटने उत्तम सुरुवात केली होती. पण, नंतर बाहेर जाणाऱया चेंडूवर तो खराब फटका खेळत बाद झाला. यापूर्वी, टी-20 मालिकेतील दोन सामन्यात विराटला अनुक्रमे 1 व 11 अशा किरकोळ धावांवर बाद व्हावे लागले. त्याशिवाय, इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यातही त्याची अपयशाची मालिका कायम राहिली होती. त्यावेळी दस्तुरखुद्द कपिलने देखील विराट खराब फॉर्ममध्ये असेल तर त्याला का वगळले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. रोहितने मात्र विराटला पूर्ण पाठबळ दर्शवले.
‘फॉर्ममध्ये चढउतार होतच राहणार, हे मी यापूर्वीही म्हणालो. प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकिर्दीतील हा अविभाज्य घटक असतो. अगदी महान खेळाडू देखील या फेऱयातून सुटलेले नाहीत. विराटकडे असलेला अनुभव पाहता, त्याला या खराब फॉर्मवर मात करण्यासाठी अगदी एक-दोन उत्तम डावही पुरेसे असणार आहेत. विराटचे मागील विक्रम, त्याची आक्रमक शतके, त्याची सरासरी, त्याचा अनुभव एकदा नजरेखालून घाला’, असे रोहित याप्रसंगी म्हणाला.
यापूर्वी दुसऱया वनडे सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 38.5 षटकात केवळ सर्वबाद 146 धावांपर्यंतच मजल मारता आली. याबद्दल बोलताना रोहितने तळाच्या फलंदाजांकडून अधिक योगदान अपेक्षित असल्याचे नमूद केले.
‘ज्या-ज्यावेळी 5-6 फलंदाज बाद झाले असतील, त्यावेळी तळाच्या क्रमवारीतील फलंदाजांवर अधिक जबाबदारी असणे साहजिक असते. माझ्या मते आपण मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आणखी सकारात्मक खेळावर भर देणे आवश्यक असून सांघिक योगदानाच्या बळावरच यश खेचून आणणे भाग असते’, असे तो तपशीलवार बोलताना म्हणाला.
बाबर आझम म्हणतो, कोहलीला प्रत्येकाच्या पाठबळाची आवश्यकता

नवी दिल्ली ः ‘विराट कोहली प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममध्ये असला तरी तो लवकरच यातून बाहेर येईल आणि नेहमीप्रमाणे त्याची बॅट तळपत राहील. मात्र, यासाठी त्याला प्रत्येक संलग्न घटकाच्या सहकार्याची आवश्यकता असेल’, असे ट्वीट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने केले. जवळपास 3 वर्षे एकही शतक झळकावू न शकलेला विराट कोहली खराब फॉर्ममुळे अधिक चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर आझमने विराटला पाठिंबा दर्शवला.
‘सध्या कोहलीला प्रत्येक संलग्न घटकाचे पाठबळ आवश्यक आहे. मी ट्वीट करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही प्रतिकूल वेळही निघून जाईल, इतकेच मी कोहलीला सांगू इच्छितो’, असे 27 वर्षीय बाबर आझमने येथे नमूद केले.
जोस बटलरची संघसहकाऱयांवर कौतुकाची बरसात
लंडन ः दुसऱया वनडे सामन्यात संघसहकाऱयांनी विजय खेचून आणण्यात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर इंग्लिश कर्णधार जोस बटलरने या प्रयत्नांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तसेच, टॉपलीच्या भेदक गोलंदाजीचा विशेष उल्लेख केला. इंग्लंडने दुसऱया वनडेत 100 धावांनी एकतर्फी विजय संपादन करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. उभय संघातील तिसरी व शेवटची लढत आता उद्या (रविवार दि. 17) ओल्ड टॅफोर्ड ग्राऊंडवर होणार आहे.
‘लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आम्ही बरेच सामने खेळलो आहोत. ही खेळपट्टी नेहमीच अनेकविध पैलू दाखवत आली आहे. वर्ल्डकप फायनलला जशी खेळपट्टी होती, त्याचा फिल दुसऱया वनडेत पुन्हा एकदा आला. फक्त लेंग्थनुसार विचार केला तर येथे धावा जमवणे आव्हानात्मक होते. गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करण्यासाठी आखलेली रणनीती काटेकोर अंमलात आणू शकतात, अशी अनुकूल स्थिती जाणवली’, याचा बटलरने येथे उल्लेख केला.









