सहभागी होण्याचे म. ए. समितीचे आवाहन ः जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागात राहणाऱया मराठी भाषिकांना मराठी भाषेतून कागदपत्रे द्यावीत, या मागणीसाठी सोमवार दि. 27 रोजी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वा. सरदार्स हायस्कूल ग्राऊंडपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे. या विराट मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठी भाषिकांना मराठीतून शासकीय कागदपत्रे देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. बेळगावमध्ये मराठी प्राबल्य असतानाही त्यांना या अधिकारापासून डावलले जाते. सरकारी कागदपत्रे, योजनांची माहिती कन्नड भाषेतून देण्यात येते. त्यामुळे मराठी भाषिकांना ती समजत नाही. यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.
बुधवार दि. 1 जून रोजी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांना 20 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने दि. 27 रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. सरदार्स ग्राऊंडपासून मोर्चाला सुरुवात होणार असून चन्नम्मा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन दिले जाणार आहे. मोर्चा यशस्वी होऊ नये यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरू आहे. त्यामुळे मोर्चा अडविला जाण्याची शक्मयता नाकारता येत नाही. जेथे कार्यकर्त्यांना अडविले जाईल तेथेच बसून शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन म. ए. समितीने केले आहे.
मोर्चासाठी शहर-तालुक्मयात जागृती
मोर्चा यशस्वी होण्यासाठी म. ए. समितीची नेतेमंडळी, युवा कार्यकर्ते, महिला गावोगावी जागृती करीत आहेत. शहरासोबत ग्रामीण भागात मराठी भाषिकांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली जात आहे. अधिकाधिक नागरिक उपस्थित रहावेत, असा निर्धार केला जात आहे. खानापूर तालुक्मयातही मोठय़ा प्रमाणात गावोगावी जागृती सभा घेतल्या जात आहेत.
युवा समितीचे आवाहन
सीमाभागातील मराठी भाषिकांना संविधानानुसार मराठी परिपत्रके, कागदपत्रे आणि भाषिक अधिकार द्यावेत, या मागणीसाठी सोमवारी काढण्यात येणाऱया विराट मोर्चाला सीमावासियांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी केले आहे.
महिला आघाडीचे आवाहन
मराठी भाषिक नागरिकांना मराठीतून कागदपत्रे मिळावीत, यासाठी सोमवारी विराट मोर्चा काढला जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून मागणी करून देखील प्रशासनाकडून अद्याप कागदपत्रे देण्यात आली नाहीत. त्यामुळे आता रस्त्यावरील लढाई लढावी लागणार असल्याने मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी केले आहे.