खा. संजय राऊतांची साताऱयात चौफेर टोलेबाजी,
मुंबईत झालेला विराट मोर्चा हा सरकारच्या विरोधात नव्हता. मोर्चा हा महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱया प्रवृत्तींच्या विरोधात होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱया शक्ती या महाराष्ट्रात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱया शक्ती निर्माण झालेल्या आहेत. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांचा अपमान झाला आहे. त्या विरोधात मोर्चा होता. केंद्र सरकारने जरी राज्यपालांना माघारी बोलवले नसले तरी कालच्या मोर्चाने त्यांना डिसमिस केले आहे. हे सरकारही डिसमिस होईल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी करत चौफेट टिका केली. दरम्यान, त्यांनी उदयनराजेंच्या भूमिकेचे सगळय़ात प्रथम शिवसेनेने केल्याचे सांगत दिल्लीश्वरांनी गुंगीचे औषध दिल्याने फडणवीस हे गुंगाराम झालेत अशीही जहरी टीका राऊत यांनी केली.
एका विवाह सोहळय़ानिमित्ताने खासदार संजय राऊत हे साताऱयाच्या दौऱयावर आले होते. तेव्हा ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राऊत म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुद्धी नॅनो आहे हे आम्हाला माहिती आहे. कालचा विराट मोर्चा दिसला नसेल त्यांनी अनुभवला नसेल तर तो मोर्चा नॅनो आहे. अपयशी आहे फेल आहे अशी भूमिका घेतली असेल तर नक्कीच मधल्या काळात दिल्लीला गेले होते. तिकडे दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचे इंजेक्शन दिलेले दिसते. त्या इंजेक्शनची भूल चढलेली दिसते. कालच्या मोर्चाचे स्वागत निदान फडणवीस यांनी करायला हवे होते. त्यांनी स्वतः मोर्चाला सामोरे जायला हवे होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. कालचा मोर्चा हा सरकार विरोधी नव्हता तर तो महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱया प्रवृत्तींच्या विरोधात होता. महाराष्ट्र – कर्नाटक सिमा प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे. या सगळय़ाच्या विरोधात काल महाराष्ट्रप्रेमी जनता एकवटली होती. तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने भाषा वापरता आहात ती चुकीची आहे. मोर्चा ज्यांना दिसला नाही त्यांच्या डोळय़ामध्ये राष्ट्रद्वेषच पराकोटीचा भरला आहे. माझे देवेंद्र फडणवीस यांना एकच सांगणे की स्वतःची अवहेलना करुन घेऊ नका. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली ते राजकारणातून पाचोळय़ासारखे उडून गेले. आमच्यावर टीका करा ना पण शिवरायांच्या घोषणा देत, फुले आंबेडकरांच्या जयजयकाराच्या घोषणा देत महाराष्ट्रातील जनता मोर्चात सहभागी झाली. तुम्ही केलेले वक्तव्य म्हणजे एकप्रकारे सुर्यावर थुकंण्याचा प्रयत्न केला आहे. जरी केंद्राने राज्यपालांना मागे बोलवले नसले तरी कालच्या मोर्चाने राज्यपालांना डिसमीस केले. हिच जनता उद्या सरकारला डिसमिस केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी परखड मत मांडले.
फडणवीसांची गुंगी अजूनही उतरत नाही
चिन्ह गोठवण्याचा किती प्रयत्न केले तर मनात आणि मनगटात असलेली शिवसेना तुम्ही कशी काढणार. पहिल टोक घोडबंदर तर दुसर टोक राणी बाग असे मोर्चाचे होतं, असे सांगत ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. त्यांना तेथे गुंगीचे औषध दिले. ती अजूनही गुंगी उतरत नाही. सगळे गुंगाराम आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान यावर बोलायचे नाही, या अटीवर त्यांना राज्यावर बसवले आहे, अशीही टीका त्यांनी केली.
उदयनराजेंच्या भूमिकेचे सगळय़ात पहिले शिवसेनेते स्वागत केले
उदयनराजेंनी घेतलेल्या भूमिकेचे सगळय़ात आधी समर्थन शिवसेनेने केले, असे सांगत राऊत म्हणाले, त्यांच्या डोळय़ातून या प्रश्नावर <जेव्हा अश्रू आले तेव्हा मी पहिला माणूस असा आहे की त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. त्यांचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. ज्या पक्षात ते आहेत तो पक्ष मुकबधीर होऊन बसलेला आहे. शेवटी ते सुद्धा माणूस आहेत आम्हाला सुद्धा वाईट वाटले. त्यांनी लढत राहिले पाहिजे. त्यांनी बोलत राहिले पाहिजे, असे सांगत उदयनराजेंच्या वक्तव्याबाबत छेडले असता ते म्हणाले, त्यांनी राजकीय वक्तव्य केले होते. आम्हीही राजकीय वक्तव्य केले होते. आमचे आणि त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध आहेत.
मुख्यमंत्री हे हेलिकॉप्टरमंत्री
मुख्यमंत्र्यानी सातारा जिह्यात हेलिपॅड बांधल्याचे मला माहिती आहे. त्यामुळे ते हेलिकॉप्टरमंत्री आहेत, अशी टीका करत पुढे राऊत म्हणाले, शरद पवार हे मोठे नेते आहेत. उद्धव साहेब पक्षाचे प्रमुख आहेत. इतके वर्ष राजकारण करतात. कोणाच्या बुद्धीने चालणारे हे लोक नाहीत. माझ्यासारखा माणूस त्यांचे नेतृत्व माणतो. उद्धवसाहेब आमचे सेनापती आहेत. सेनापती सांगेल त्यानुसार शिवसैनिक काम करतो. सैनिकांनी फार बुद्धी चालवायची नसते फक्त आदेश पाळायचा असतो. या महाराष्ट्रावर पवारसाहेबांचे नेतृत्व आहे. वर्षानुवर्षे त्यांनी राज्याचे, देशाचे नेतृत्व केले. त्यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंसारखी लोक बोलतात त्यांना शोभतं का, एका बाजूला मोदी त्यांना गुरु मानतात. ही त्यांची तात्पुरती फडफड आहे, अशी टीप्पणी केली.
महाराष्ट्राला मुर्ख समजताय काय
महाराष्ट्र- कर्नाटक प्रश्नी जैसे थे परिस्थिती निर्माण करणे ही मध्यस्थी नाही. प्रकरण सर्वोंच न्यायालयात गेल्यानंतर परिस्थती जैसे थेच आहे. ही सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आहे त्यांना माहिती नसेल तर सांगतो. तुम्ही महाराष्ट्राला काय मुर्ख समजला काय, महाराष्ट्राला काय नॅनो बुद्धीचे समजला काय, हा ज्ञानदेवाचा महाराष्ट्र आहे नॅनोचा नाही. तुम्ही काय सांगता जैसे थे, आम्हाला शिकवता ज्या शिवसेनेने सिमा प्रश्नासाठी 70 हुतात्मे दिलेले आहेत त्यांना सांगता. तुम्ही जैसे थे, जर जैसे थे परिस्थिती असेल तर मुख्यमंत्र्यांनी काय तिकडे तोंड उघडले. उपमुख्यमंत्री काय बोलले, जेसे थे केव्हा होईल बेळगाव महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा उतरवला आहे तो परत लावा, तो शिवरायांचा भगवा झेंडा होता. तो या कन्नड सरकारने उतरवला. त्यानंतर मराठी लोकांवर गुन्हे दाखल केले ते मागे घ्या, त्याला परिस्थिती जैसे थे म्हणेण, बेळगावचे दप्तर आहे ते मराठी भाषेत व्हायला पाहिजे. कारण आमच्या 20 लाख लोकांना कानडी भाषा येत नाही. सरकारी कागदपत्रे वाचता येत नाहीत. त्यांना सरकारी कागदावर अंगठा लावावा लागतो. ही काय पद्धत आहे देशात जर ते आधीप्रमाणे निर्माण केले तर जैसे थे म्हणता येईल. 2018 च्या केसेस आता काढताना माझ्यावर वॉरंट काढले आहेत. दिवाकर रावते मंत्री असताना गेले. शरद पवार विरोधी पक्ष नेते असताना गेले. कोल्हापूरात वारंवार आंदोलने बैठका झाल्या. त्याला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. एस. एम. जोशी असतील, काँम्रेड डांगे असतील, एन. डी. पाटीलांनी आपलं आयुष्य आंदोलनात घालवलं आहे. पालकमंत्री हे सिमेवरुन परत आले. पण आम्ही सगळे जाणार असे सांगत पुढे ते म्हणाले, 70 वर्ष सिमा वाद लढतोय, ही लढाई आहे, हक्काची आहे. 2014 ला पाकव्याक्त कश्मिर घेतो म्हणाले होते. एक इंच घेतली नाही, असेही त्यांनी टीका केली.








