वृत्तसंस्था/ बेंगळूर
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला शनिवार दि. 22 मार्चपासून प्रारंभ होत आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचे बेंगळूरमध्ये आगमन झाले असून त्याने आपल्या सरावालाही प्रारंभ केला. आरसीबीचा प्रमुख फलंदाज म्हणून विराट कोहलीकडे पाहिले जाते. आरसीबीचे नेतृत्व यावेळी रजत पाटीदारकडे सोपविण्यात आले आहे. आरसीबीचा या स्पर्धेतील सलामीचा सामना विद्यमान विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सबरोबर शनिवारी इडन गार्डन्स मैदानावर खेळविला जाईल.
विराट कोहलीला चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत फलंदाजीचा सूर मिळाला आणि त्याने आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली. चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेत विराटने पाच सामन्यात 54.50 धावांच्या सरासरीने 218 धावा जमाविल्या. या स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक धावा जमाविणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. पाक विरुद्ध त्याने नाबाद शतक झळकाविले. तर बलाढ्या ऑस्ट्रेलिया बरोबरच्या सामन्यात त्याने 98 चेंडूत 84 धावांची खेळी केली. विराटचा हा 18 वा आयपीएल हंगाम आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत 252 सामन्यात 8004 धावा जमविल्या असून त्यामध्ये 8 शतके आणि 55 अर्धशतकांचा समावेश आहे.









