वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विराट कोहलीसाठी वेस्ट इंडिज दौरा संपुष्टात आला असून हा भारतीय स्टार फलंदाज कॅरेबियन बेटावरून गुरुवारी एका विशेष चार्टर फ्लाइटने परतला. वेस्ट इंडिजविरु द्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांत विश्रांती दिलेल्या भारताचा माजी कर्णधार कोहलीने खासगी जेटमधील प्रवासासची छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. आपल्या विमानाची व्यवस्था केल्याबद्दल त्याने खासगी जेट सेवेचेही आभार मानले आहेत.
माझ्या फ्लाइटची आणि उत्तम सेवेची व्यवस्था केल्याबद्दल एअर चार्टर सेवा आणि कॅप्टन अबू पटेल यांना धन्यवाद, असे कोहलीने पोस्टला कॅप्शन दिले आहे. संघ व्यवस्थापनाने फलंदाजीच्या क्रमाच्या बाबतीत प्रयोग केल्यामुळे कोहलीला पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. यंदा विश्वचषक स्पर्धा होणार असताना कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना शेवटच्या दोन वनडेत विश्रांती देण्याच्या निर्णयावर माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केलेली आहे.
शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलेल्या हार्दिक पंड्याने, विश्वचषकापूर्वी युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी दिग्गज खेळाडू रोहित आणि कोहली यांना विश्रांती देण्याची गरज असल्याचे म्हटलेले आहे. ‘विराट आणि रोहित हे संघाचे अविभाज्य भाग आहेत. ऋतुराज गायकवाड किंवा अक्षर पटेलसारख्या खेळाडूला सामन्यात खेळण्यास मिळणे हे खूप महत्वाचे होते. ते इतकी वर्षे क्रिकेट खेळत आहेत. त्यांना परिस्थिती कशी आहे ते माहीत आहे’, असे पंड्याने म्हटले आहे.









