ऑनलाईन मतदानात मेस्सीला टाकले मागे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इन्स्टाग्राम या सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया पेजचे सुमारे 35 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स असून त्यांचेच उपचॅनेल असलेल्या प्युबिटी स्पोर्ट या 20 चॅनेल्सच्या ऑनलाईन समुदायाने आयोजित केलेल्या ऑनलाईन मतदानात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने महान फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीला मागे टाकत प्युबिटीचा वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार मिळविला.
नॉकआऊट पद्धतीने यासाठी मतदान घेण्यात आले. नोव्हॅक जोकोविच, पॅट कमिन्स, लेब्रॉन जेम्स, अर्लिंग हालांड, क्रिस्टियानो रोनाल्डो, मॅक्स व्हर्स्टापेन यासारख्या क्रीडापटूंसाठी एकमेकांविरुद्ध मतदान घेण्यात आले. त्यात कोहली व मेस्सी यांनी अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत कोहलीला सर्वात जास्त पसंत मिळाली. त्याला एकूण 78 टक्के मते मिळाली तर मेस्सीला 22 टक्के मते मिळाली. त्यामुळे कोहलीला 2023 मधील प्युबिटीचा सर्वोत्तम अॅथलीटचा पुरस्कार मिळाला.
मागील वर्षात कोहलीने फलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन केले असून त्याने 8 शतके, 10 अर्धशतकांसह सर्व प्रकारांत मिळून 2048 धावा जमविल्या. अलीकडेच झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याने सर्वाधिक 765 धावा फटकावत स्पर्धावीरचा पुरस्कार मिळविला होता.
2022 मधील कामगिरीसाठी मेस्सीने मागील वर्षी बॅलन डीओर पुरस्कार मिळविला. पॅरिस सेंट जर्मेन संघाला त्याने लिग 1 चे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावताना एकूण 41 गोल नोंदवले. 2022 डिसेंबरमध्ये त्याने अर्जेन्टिनाला विश्वचषक मिळवून दिला. या स्पर्धेत त्याने सात सामन्यात 7 गोल व तीन गोलसाठी साह्या केल्यामुळे त्याला गोल्डनबॉलचा पुरस्कार मिळाला होता.









