वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा बहुमान मिळविला. सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोहलीची फलंदाजी चांगलीच बहरली आहे. महिलांमध्ये हा बहुमान पाकच्या निदा दारला मिळाला.
या स्पर्धेमध्ये कोहलीने आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताला पाकविरुद्ध सणसणीत विजय मिळवून दिला होता. ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत कोहलीने 205 धावा जमविल्या आहेत. सिडनीमध्ये नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतकही झळकविले होते. तसेच मेलबोर्नच्या सुमारे 1 लाख शौकिनांच्या साक्षीने पाकविरुद्धच्या सामन्यात निर्णायक खेळी केली होती. या सामन्यात त्याने 53 चेंडूत नाबाद 82 धावा झोडपल्या होत्या. ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या शर्यतीमध्ये कोहली, दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांचा समावेश होता. पण कोहलीने या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. कोहलीच्या समयोचित फलंदाजीमुळे भारतीय संघाने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्यफेरीचा सामना ऍडलेड येथे गुरुवार दि. 10 नोव्हेंबरला होणार आहे.









