वृत्तसंस्था /दुबई
भारताचा ‘स्टार’ फलंदाज विराट कोहलीला गुरुवारी 2023 सालचा आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटूचा किताब घोषित करण्यात आला. या प्रकारात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या विश्वचषकात मायदेशातील मैदानांवर त्याने केलेल्या अप्रतिम खेळीचा यात समावेश होतो. कोहलीचा हा चौथा पुरस्कार असून तो गतवर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलच्या मागे सर्वाधिक धावा जमविणारा खेळाडू ठरला. भारताच्या या माजी कर्णधाराने सहा शतके आणि आठ अर्धशतकांच्या जोरावर 1,377 धावा जमवून गतवर्ष पूर्ण केले. हे वर्ष त्याच्या कायम स्मरणात राहील. कारण त्यात कोहलीने सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत जास्त शतकांचा प्रदीर्घ काळ टिकलेला विक्रम मागे टाकला आणि देशाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत केली. विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये त्याने 765 धावा फटकावल्या आणि त्याबद्दल त्याला स्पर्धावीर पुरस्कार देखील प्राप्त झाला.
कोहलीला त्याच्या कारकिर्दीत लाभलेला हा सातवा वैयक्तिक आयसीसी पुरस्कार आहे, तर 2012, 2017 आणि 2018 नंतरचा एकदिवसीय क्रिकेटमधील चौथा पुरस्कार आहे. त्याने 2018 मध्ये कसोटीतील पुरस्कार देखील जिंकला होता, तर 2017 आणि 2018 मध्ये ‘आयसीसी वर्षाच्या सर्वोत्तम पुऊष क्रिकेटपटू’साठीचा सर गारफिल्ड सोबर्स चषक पटकावला होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला 2023 वर्षातील सर्वोत्कृष्ट पुऊष क्रिकेटपटूसाठीचा सर गारफिल्ड सोबर्स चषक प्राप्त झालेला असून इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू नॅट सिव्हर-ब्रंटने सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा याला वर्षातील सर्वोत्तम पुऊष कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले असून श्रीलंकेच्या चामारी अटापटूला तिचा पहिला महिला ‘वनडे क्रिकेटर ऑफ दि इयर’ पुरस्कार मिळालेला आहे.









