कोलकाता आणि कला हे फारच जवळचे नाते. रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा आणि सौरव गांगुली असे दिग्गज व्यक्ती याच कोलकात्याने आपल्याला दिले. त्याच कोलकात्याच्या भूमीत काल दोन वाघांमध्ये आपल्याला उपांत्य फेरी अगोदरचा ट्रेलर बघायला मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु पुन्हा एकदा क्रिकेटने आपला रंग दाखवला. काल पुन्हा एकदा मी तोंडावर आपटलो. जसे काही वॉशिंग पावडरच्या जाहिरातीत दाग अच्छे असतात. तसेच मला काल इथे तोंडावर आपटणं चांगलं वाटलं. गंमत बघा, हा सामना सुरू होण्याअगोदर मिस्टर डकवर्थ-लुईसने पाकिस्तानला तारलं. त्यामुळे उपांत्य फेरीतील पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाण यांच्या चौथ्या क्रमांकासाठी आशा बळावल्या.
काल रोहितने नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतली हे एका अर्थाने चांगलं केलं. कारण उपांत्य फेरीत दुर्दैवाने नाणेफेकीचा कौल विरोधात गेला आणि प्रथम फलंदाजी आली तर त्यासाठी आपण सक्षम आहोत हे रोहितने काल दाखवून दिले. ईडन गार्डनचे मैदान आणि रोहित यांचे फार जवळचे नातं. याच मैदानावरून त्याने अक्षरश: खोऱ्याने धावा जमवल्यात. बास्केटबॉलमध्ये शेवटच्या क्षणी खेळाडू वरच्यावर बास्केटमध्ये बॉल टाकतो. अगदी त्याचप्रमाणे रोहितने आपल्या बॅटने काही चेंडू अगदी सहज सीमापार टोलावले.
परंतु काल खऱ्या अर्थाने कळस केला तो विराट कोहलीने. वाढदिवसाच्या दिवशी शतकाची मेजवानी. त्याची आजची फलंदाजी बघून माझं उर भरून आलं. ज्यावेळी सचिन तेंडुलकरच्या 101 व्या कसोटी सामन्याच्या निमित्त ज्यावेळी मी वानखेडे स्टेडियमवर समालोचनासाठी गेलो होतो, त्यावेळी मी सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर सरांना त्यांच्या वरळी स्थित निवासस्थानी मुलाखत घ्यायला गेलो होतो. त्यामुळे मी एक ओघवता प्रश्न त्यांना विचारला होता की, उत्कृष्ट फलंदाज नेमका कसा ओळखावा, त्यावर ते हसत हसत म्हणाले, जो चांगल्या चेंडूवर जमिनीलगत आणि विशेषत: कव्हर क्षेत्राच्या बाजूने चेंडू खेळतो तो भविष्यात उत्कृष्ट फलंदाज बनू शकतो. अर्थात दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर आणि आता विराट कोहली हे त्याच पठडीतले खेळाडू. सुभाष घईच्या चित्रपटात जसे एक दोन एन्ट्रीशिवाय त्यांचा चित्रपट पूर्ण होत नाही तसेच विराट कोहलीचं आहे. त्याच्या शतकी खेळीत तीन ते चार कव्हर ड्राईव्हशिवाय त्याचे शतक पूर्ण होणार नाही. सवयीने आपण जसं रोज सकाळी नाष्टा करतो तसं सवयीने विराट शतक ठोकतो. सध्या तरी त्याच्या फलंदाजीला तोड नाही. काही शतकं फलंदाजांच्या आयुष्यात विशेष असतात. कारण विराटसाठी कालचे शतक हे विशेषच होतं कारण काल त्याचा जन्मदिवस होता. भारतीय फलंदाज सध्या तरी खिशात धावांचे क्रेडिट कार्ड घेऊन फिरत आहेत असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरू नये. जसं महाभारतामध्ये भीष्माचार्याकडे ऐच्छिक मृत्यूचा वर होता तसेच भारतीय संघाने ऐच्छिक पराभवाचा वर साक्षात ब्रह्मदेवाकडून मागून घेऊन आले असावेत, असे वाटते. भारतीय संघ सध्या मेनू कार्डच्या डाव्या बाजूला बघतोय. उजव्या साईडला त्याची किंमत काय आहे ही त्यांच्यासाठी गौण गोष्ट आहे.
गोलंदाजीत अचूकता म्हणजे काय ते तुम्ही ग्लेन मॅकग्रा किंवा वॉल्शला विचारा. नेमकी हीच गोष्ट आता जागतिक क्रिकेटमध्ये वरिष्ठ संघाने आता भारतीय गोलंदाजांना विचारलं तर त्यात आश्चर्य वाटू नये. जी दुपारी खेळपट्टी सिमेंट खेळपट्टी वाटत होती नेमक्या त्याच खेळपट्टीवर आफ्रिकेची त्यांनी दाणादाण उडवली. आज शमी, सिराज आणि बुमराहच्या पंक्तीत रवींद्र जडेजा अगदी अलगद जाऊन बसला. पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी फलंदाजांना अतिशय छान साथ दिली. आणि बघता बघता विजयअष्टमी साजरी केली. एकंदरीत हा सामना विराट कोहलीसाठी संस्मरणीय. जन्मदिवशी शतक तेही विश्वचषकासारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर. एकंदरीत विराट कोहलीने आपल्या वाढदिवशी करोडो भारतीयांना मेजवानी दिली, असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा विराट कोहलीच्या शतकास त्रिवार सलाम!
क्रिकेट समालोचक विजय बागायतकर









