वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टी-20 आणि अलिकडेच कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतरही भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली विक्रम मोडत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी त्याचे कमाल टी-20 रेटिंग पॉईंट्स 909 पर्यंत वाढवले आहेत. यामुळे तो खेळाच्या सर्व स्वरुपांमध्ये आयसीसी पुरुष क्रिकेट रँकिंगमध्ये 900 गुणांचा टप्पा ओलांडणारा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव फलंदाज बनला आहे.
गेल्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत 76 धावा काढल्यानंतर टी-20 मधून निवृत्त झालेल्या विराटची टी-20 रेटिंगमध्ये सुधारणा झाली. विस्डेननुसार त्याचे सर्वकालीन टी-20 रेटिंग 897 वरुन 909 पर्यंत आयसीसीने अपडेट केले आहे. आयसीसी पुरुष टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव (912) आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान (919) यांच्यानंतर फलंदाजाने मिळवलेले हे तिसरे सर्वोच्च रेटिंग गुण आहेत.
आयसीसी पुरुष कसोटी क्रमवारीत विराटचे सर्वोच्च रेटिंग गुण 937 आहेत. जे भारतीय फलंदाजांसाठी सर्वोच्च आणि एकूण 11 वे सर्वोच्च गुण आहेत. त्याने 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान हे साध्य केले होते. जिथे त्याने 10 डावांमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांसह 593 धावा केल्या होत्या आणि फलंदाजांसाठी एका वाईट ठरलेल्या मालिकेत तो भारताचा एकमेव योद्धा होता.
एकदिवशीय सामन्यांमध्ये 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान विराटचे रेटिंग गुण 909 वर पोहोचले होते. त्या दरम्यान त्याने तीन एकदिवशीय सामन्यांमध्ये 191 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये दोन अर्धशतके होती. यशाच्या शिखरावर असताना विराटला आयसीसी पुरुषांच्या कसोटी, एकदिवशीय आणि टी-20 क्रमवारीत एकाचवेळी नंबर वन फलंदाज म्हणून गणले जात होते. तो सर्वकालीन सर्वोत्तम ऑल फॉरमॅट फलंदाज असल्याचे स्पष्ट होते.
विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि 125 सामने आणि डावांमध्ये 48.69 च्या सरासरीने 4188 धावा केल्या. ज्यामध्ये एक शतक आणि 25 अर्धशतके आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 122 आहे. तो या फॉरमॅटच्या इतिहासात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सर्व फॉरमॅटमध्ये विराटने 52.27 सरासरीने 27599 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 617 डावांमध्ये 82 शतके आणि 143 अर्धशतके आहेत आणि 254 हा सर्वोत्तम स्कोअर आहे. तो भारताचा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू आहे आणि एकूण तिसरा सर्वोच्च आहे.









