आलिशान गाड्या, घड्याळ, प्रॉपर्टी आणि बरच काही : अनेक जागतिक ब्रँड्सचाही मानकरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीची गणना जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये होते. विराटला फक्त भारतातच नाही, तर जगभरात मोठा चाहतावर्ग लाभला आहे. याशिवाय विराट हा अनेक गोष्टींनी नेहमी चर्चेत असतो. सध्या तो आपल्या संपत्तीमुळे चर्चेत आला आहे. विराटच्या संपत्तीचा जो आकडा समोर आला आहे ते पाहून तुमचेही डोळे फिरल्याशिवाय राहणार नाही. विराटची संपत्ती 1000 कोटी रुपयांपार गेली आहे. इन्स्टाग्रामवर 25 कोटी फॉलोअर्स असलेल्या कोहलीच्या एकूण संपत्तीबाबत स्टॉक ग्रोने हा खुलासा केला आहे. स्टॉक ग्रोच्या माहितीनुसार, सध्या विराटची नेट वर्थ ही 1050 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये सामन्यांची फी, सोशल मीडिया पोस्ट, ब्रँडच्या जाहिराती, स्थावर मालमत्ता, गाड्या, स्वत:चे व्यवसाय व गुंतवणूक अशा विविध रुपातील आर्थिक स्रोतांचा समावेश आहे.
स्टॉकग्रो या बेंगळूरस्थित ट्रेडिंग आणि गुंतवणूक कंपनीच्या मते, कोहलीची एकूण संपत्ती 1,050 कोटी रुपये आहे. तो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे. यानुसार कोहली टीम इंडियाचा ए प्लस ग्रेड खेळाडू आहे. यामुळे त्याला वर्षाला सात कोटी रुपये मिळतात. याशिवाय त्याची फी प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडे सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 साठी 3 लाख रुपये आहे. टी-20 लीग खेळण्यासाठी त्याला दरवर्षी 15 कोटी रुपये मिळतात.

स्टार्टअपमध्ये गुंतवणूक आणि मालक
विराटने 7 स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. या स्टार्टअपमध्ये ब्लू ट्राईब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिज, एमपीएल आणि स्पोर्ट्स कॉन्वो यांचा समावेश आहे. या सर्व स्टार्टअपमध्ये विराटने कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त विराटने स्वत:च्या पाच स्टार्टअप कंपन्या सुरु केल्या आहेत. यामध्ये आलिशान दोन रेस्टॉरंट, डायनिंग बार आणि रेस्टॉरंट, स्टेपथलोन यांचाही समावेश आहे.
जाहिरातींमधून भली मोठी कमाई, सर्वाधिक ब्रँड फी
आशियामध्ये विराट आज बॉलिवूड आणि क्रीडाक्षेत्रात सर्वाधिक ब्रँड फी घेणारा खेळाडू आहे. विराट प्रत्येक जाहिरात शूटसाठी वर्षाला 7.50 ते 10 कोटी रुपये घेतो. विराटकडे सध्या एकूण 26 ब्रँड्स आहेत. यामध्ये व्हिवो, ब्लूस्टार, लक्सर, एचएसबीसी, उबर, स्टार स्पोर्ट्स, एमआरएफ आणि सिंथॉल यांसारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे. या बाबतीत तो बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रात आघाडीवर आहे. अशा ब्रँडसमधून तो सुमारे 175 कोटी रुपये कमावतो. याशिवाय विराट फुटबॉल, टेनिस आणि कुस्ती संघांचाही मालक आहे.
तब्बल 110 हून अधिक कोटींची प्रॉपर्टी आणि 31 कोटींच्या गाड्या
विराटकडे 110 हून अधिक कोटींची प्रॉपर्टी आहे. त्यात मुंबईतील 34 कोटींच्या आणि गुडगाव येथील 80 कोटी किंमतीच्या घरांचा समावेश आहे. तसेच, विराटकडे 31 कोटी रुपयांच्या गाड्याही आहेत. विराट ऑडी या कार कंपनीचा ब्dराँड अॅम्बेसिडर आहे. या कंपनीच्या विराटकडे आर 8 व्ही 10 प्लस, आर 8 एलएमएक्स, ए 8 एल, क्यू 8, क्यू 7, आरएस 5 आणि एस 5 अशा 7 गाड्या आहेत. याव्यतिरिक्त त्याच्याकडे, फॉर्च्युनर, रेंज रोव्हर आणि बेंटली या कंपनीची गाड्याही आहेत.
सोशल मीडियावर बादशाह
विराट फक्त क्रिकेट आणि जाहिरातीमधून कमाई करत नाही तर तो सोशल मीडियाचा बादशहा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तो कमाई करतो. सोशल मीडियाबद्दल सांगायचे झाले तर, विराट इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये घेतो. याचवेळी, ट्विटरवर तो एका पोस्टसाठी अडीच कोटी रुपये घेतो.









