वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विंडीजविरुद्ध आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघातून विराट कोहली व जसप्रित बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. ही मालिका कॅरेबियन व अमेरिकन भूमीत दि. 29 जुलैपासून खेळवली जाईल. त्यापूर्वी, उभय संघात 3 वनडे होत असून त्यासाठी यापूर्वीच संघ जाहीर केला गेला आहे.
5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अलीकडेच स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया करवून घेतलेला केएल राहुल व कुलदीप यादव यांचा 18 सदस्यीय संघात समावेश असला तरी तंदुरुस्ती चाचणी पार केल्यानंतरच ते पथकात दाखल होऊ शकतील, असे भारतीय संघव्यवस्थापनाने जाहीर केले. कुलदीप यादवला यापूर्वी जूनमध्ये संपन्न झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील मालिकेदरम्यान हाताची दुखापत झाली होती.
दरम्यान, विंडीजविरुद्ध मालिकेसाठी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झाले आहे. त्याने आपला शेवटचा टी-20 सामना गतवर्षी नोव्हेंबरमध्ये खेळला आहे. प्रदीर्घ कालावधीपासून बहरात नसलेल्या विराट कोहलीने विंडीजविरुद्ध 3 वनडे व 5 टी-20 सामन्यांच्या या मालिकेतून विश्रांती देण्याची मागणी यापूर्वीच केली होती. ती मंजूर करण्यात आली. उभय संघातील ही मालिका दि. 22 जुलैपासून सुरु होत आहे.
यजुवेंद्र चहलला विश्रांती
स्टार लेगस्पिनर यजुवेंद्र चहलला देखील मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. कोहलीप्रमाणेच बुमराह देखील या मालिकेत खेळणार नाही. वनडे मालिकेत समाविष्ट नसलेले कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत व हार्दिक पंडय़ा नंतर टी-20 मालिकेसाठी संघात परतणार आहेत. विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत शिखर धवनकडे नेतृत्वाची धुरा असेल.
लेगस्पिनर रवि बिश्नोई व पेसर अवेश खान यांनी टी-20 संघातील आपली जागा कायम राखली आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध शेवटच्या दोन टी-20 सामन्यात समाविष्ट नसणारा डावखुरा पेसर अर्शदीप सिंग येथे संघात परतला आहे. इंग्लंडमध्ये मालिका जिंकलेल्या संघातील जलद गोलंदाज उमरान मलिकला संघातून वगळण्यात आले.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल (तंदुरुस्ती चाचणीवर अवलंबून), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव (तंदुरुस्ती चाचणीवर अवलंबून), भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
भारत-विंडीज मालिकेची रुपरेषा
- तारीख लढत भारतीय प्रमाणवेळ ठिकाण
- 22 जुलै पहिली वनडे सायं. 7 वा. पोर्ट ऑफ स्पेन
- 24 जुलै दुसरी वनडे सायं. 7 वा. पोर्ट ऑफ स्पेन
- 27 जुलै तिसरी वनडे सायं. 7 वा. पोर्ट ऑफ स्पेन
- 29 जुलै पहिली टी-20 रात्री 8 वा. टॉरोबा
- 1 ऑगस्ट दुसरी टी-20 रात्री 8 वा. बॅस्सेतेरे
- 2 ऑगस्ट तिसरी टी-20 रात्री 8 वा. बॅस्सेतेरे
- 6 ऑगस्ट चौथी टी-20 रात्री 8 वा. लॉडरहिल
- 7 ऑगस्ट पाचवी टी-20 रात्री 8 वा. लॉडरहिल.









